लातूर - गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस-भाजपकडून लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आता हा सस्पेंस संपला असून काँग्रेसतर्फे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे धाकटे चिरंजिव धीरज यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर गेल्या अनेक दिवसांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या रमेश कराड यांचा पत्ता भाजपने ऐनवेळी कापला आहे. दरम्यान, भाजप-सेना युतीकडून ही जागा शिनसेनेला सोडण्यात आल्याने मतदारसंघात कमालीची चुरस निर्माण झाली आहे.
लातूर ग्रामीण मतदारसंघात स्थापनेच्या सुरुवातीपासूनच काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. २००९ च्या विधानसभा निवडणूकीत वैजनाथ शिंदे तर त्यानंतर २०१४ च्या निवडणूकीत अॅड. त्र्यंबक भिसे यांनी य मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून जिल्हा परिषद सदस्य म्हणून धीरज देशमुखांनी जनसंपर्क वाढवला आहे. आणि अशातच आता त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे विलासरावांच्या धाकटे चिरंजिव देखिल प्रथमच विधानसभेच्या आखाड्यात असणार आहेत. तर दुसरीकडे भाजपकडून आपल्यालाच तिकिट मिळेल या आशेने पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन रमेश कराड यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून ग्रामीण भाग पिंजून काढला आहे. मात्र, ऐनवेळी युतीच्या ताळमेळ न बसल्याने त्यांचा पत्ता कट झाला आहे. ही जागा आता सेनेकडे गेल्याने रमेश कराड हे शिवसेनेकडून प्रयत्न करतात की अपक्ष नशीब आजमावतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर शिवसेनेकडूनही इच्छूकांची प्रचंड गर्दी पाहवयास मिळत आहे. त्यामुळे लातूर ग्रामीण मतदारसंघाबाबत सर्वच समीकरणे बदलल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे.
३ साखर कारखाने, शैक्षणिक संस्था अन् विलासराव देशमुखांची पुण्याई ही धीरज देशमुखांची उजवी बाजू आहे. मात्र, नव्याने विधानसभा लढवणाऱ्या धीरज देशमुखांसमोर कुणाचे आव्हान राहणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.