लातूर- सत्ता परिवर्तन झाले. मात्र, सर्वसामान्य जनतेच्या पदरी काय पडले, हा प्रश्न कायम आहे. रस्ते दुरुस्ती आणि कागदपत्रांची जुळवाजुळव करून कामे करण्यात काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीवर आहे. रस्त्यांची कामे घ्यायची आणि भ्रष्टाचार करायचा हे सरकारचे धोरण. नांदेड-लातूर या रस्त्याच्या कामावर जेवढा निधी खर्ची झाला त्या खर्चातून उजणीचे पाणी लातूरकरांना मिळाले असते. मात्र, याकडे विरोधक व सत्ताधारी दुर्लक्ष करीत असल्याने लातूरकरांवर ही वेळ आली असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
शहरातील आंबेडकर पार्क येथे वंचित तर्फे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी सदर प्रतिक्रिया दिली. पिण्याच्या पाण्यापासून जिल्ह्यातील लोक कायम वंचित राहिले आहेत. याच मुद्यावर गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्याचे राजकारण होत आहे. मात्र, आद्यपही प्रश्न कायम आहे, हे दुर्दैव. लिंगायत समाजाने स्वतंत्र धर्माची मागणी केली आहे. यामध्ये काही गैर नाही. शिवाय ही मागणी पूर्ण केली तर सरकारचे काही नुकसानही नाही. मात्र, राजकीय पोळी भाजण्यासाठी याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सत्तेत आल्यावर ही मागणी पूर्ण केली जाईल, असे आश्वासन यावेळी आंबेडकर यांनी दिले.
देशात एकीकडे महापूर आणि दुसरीकडे कोरडा दुष्काळ अशी स्थिती आहे. त्यामुळे ओल्या भागातील पाणी दुष्काळी भागाकडे नेले पाहिजे. आणि ही सरकारची जबाबदारी आहे. यासारखे असंख्य प्रश्न असतानाही केवळ राष्ट्रहिताचे प्रश्न घेऊन सध्याचे राजकारण सुरू आहे. एकीकडे आर्थिक मंदी डोके वर काढत आहे. आणि सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे.
हेही वाचा- तर मग 'घंटा' घेऊन वाजवत बस; नितीन गडकरींचा काँग्रेसच्या कार्यकर्त्याला अजब सल्ला
दरवर्षीच्या ऑक्टोबरमध्ये सरकारच्या तिजोरीत पैसा जमा होतो. यंदा यामध्ये ४० टक्के घट झाली असून आता याची भर सर्वसामान्य जनतेकडून वसूल होणार. यामुळे ज्या सरकारला अर्थव्यवस्था सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार. त्यामुळे आगामी निवडणुकीत या सरकारला खाली खेचण्याचे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. सभेदरम्यान जिल्हयातील सहाही मतदारसंघातील उमेदवार उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक नवा पर्याय जनतेसमोर असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा- 'आम्ही काय केले ते जनतेला माहितीये, तुम्ही काय दिवे लावले ते सांगा'