लातूर - लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मात्र, आचारसंहितेचा भंग केल्याने लातूर शहरातील एका कॉम्प्युटर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फर्मच्या फलकावर राजकीय नेत्याचा फोटो असल्याने मनपाकडून त्याच्यावर गुरूवारी कारवाई करण्यात आली.
शहरातील यशवंतराव चव्हाण कॉम्प्लेक्समध्ये उद्धव भिकाजी देशपांडे व अर्चना देशपांडे हे दाम्पत्य कॉम्प्युटर इंस्टिट्यूट चालवतात. प्रचिती कॉम्प्युटर असे फर्मचे नाव असून नावाच्या जवळच राजकीय नेत्याचा फोटो लावण्यात आला होता. हीच बाब देशपांडे दाम्पत्यांना चांगलीच महागात पडली असून आदर्श अचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी या दोघांवर शिवाजी नगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
महानगपालिकेचे क्षत्रिय अधिकारी संजय कुलकर्णी यांच्या फीर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. देशपांडे दाम्पत्यांना शिवाजी नगर ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन मनपा आयुक्त एम. डी. सिंह यांनी केले आहे. पथक प्रमखांना अशी बाब निदर्शनास आल्यास कारवाई अटळ असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.