लातूर - शिवजयंती साजरी करण्याबाबत राज्य सरकारने नियमावली सादर केली आहे. केवळ दहा जणांच्या उपस्थितीत ही जयंती साजरी करण्याचे परिपत्र काढण्यात आले आहे. याचा विरोध करीत लातूर येथे परिपत्राची तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. छावा संघटना आणि भाजपच्या पदाधिकारी यांनी ही बैठक घेतली.
शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
शिवजयंतीच्या अनुषंगाने निलंगा तसेच लातूर येथे सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पण राज्य सरकारने गुरुवारी शिवजयंती साजरी करण्याबाबत परिपत्रक काढले आहे. यामध्ये शिवभक्तांना एकत्र येऊन दरवर्षी प्रमाणे शिवजयंती साजरी करता येणार नाही. केवळ दहा जणांच्या उपस्थितीत ही जयंती साजरी करण्याचे आवाहन राज्य सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे शिवभक्तांमध्ये नाराजी असून याबाबत शुक्रवारी येथील शासकीय विश्राम गृहावर छावा संघटनेचे पदाधिकारी तसेच भाजपचे पदाधिकारी यांची बैठक पार पडली.
सरकारने निर्णय न बदलल्यास तो मोडीत काढून शिवजयंती साजरी होणार
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना सर्व काही सुरू होत आहे. सार्वजनिक ठिकाणीही कार्यक्रम पार पडत आहेत. असे असताना मग शिवजयंती उत्सवालाच विरोध का, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने काढलेले परिपत्रक मागे घ्यावे व शिवभक्तांच्या उत्सवावर गदा आणू नये, असा सूर बैठकीत निघाला. एवढेच नाही तर, सरकारने निर्णय बदलला नाही तर तो मोडीत काढून यंदा शिवजयंती साजरी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी करून परिपत्रकाची तसेच मुख्यमंत्री यांच्या पुतळ्याची होळी करण्यात आली. या वेळी, छावा संघटनेचे कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील, भाजपचे अरविंद पाटील-निलंगेकर उपस्थित होते.