लातूर - काँग्रेसचा बालेकिल्ला लातूर हा इतिहास होता. आता संपूर्ण जिल्हा भाजपमय असून भविष्यातही येथे वर्चस्व कायम ठेवून काँग्रेस उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली पाहिजे, अशी स्थिती निर्माण करण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केले. सर्वसामान्य जनतेलाही माहिती झाले आहे की, देश कुणाच्या हातामध्ये सुरक्षित आहे. त्यानुसारच मतदानाला सामोरे जा, असे सांगत आमदार अमित देशमुख यांच्यावरही त्यांनी टीका केली.
लातूर ग्रामीण मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी काँग्रेसचे आमदार अमित देशमुख आणि अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर मुखमंत्र्यांनी टीकास्त्र सोडले. राहुल गांधी यांचे भाषण म्हणजे मनोरंजनाचा कार्यक्रम झाला आहे. त्यांच्या आजीपासून ते आता स्वतः देखील गरिबी हटावची घोषणा करत आहेत. याची त्यांना लाज कशी वाटत नाही? हे ७२ हजार देऊ म्हणत आहेत, पण यांच्याकडे कसल्याही प्रकारचे नियोजन नाही. त्यामुळे त्यांची ही योजना फसवी असल्याची टीका फडणवीस यांनी केली.
सुरक्षा आणि विकासाच्या मुद्द्याला समोर ठेऊन मतदान करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. शेतकऱ्यांना पेन्शन देणारा भारत हा आपला पहिला देश असून पाकिस्तानला धडा शिकविण्याची हिम्मत केवळ मोदींमध्येच असल्याचेही ते म्हणाले. लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला हा आता इतिहास झाला आहे. आता हाच जिल्हा भाजपमय झाला असून स्थानिक स्वराज्य संस्थापासून चित्र बदलेले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यावेळी म्हणाले की, संकटकाळी मुख्यमंत्री हेच लातूरकरांच्या मदतीला धावून आले. शिवाय रामनवमी दिवशी मुख्यमंत्री लातुरात आले म्हणजे रामराज्य येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी रमेश कराड, पाशा पटेल, उमेदवार सुधाकर शृंगारे यांची उपस्थिती होती.