लातूर - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिक्षण पद्धतीमध्येही बदल करावा लागत आहे. लातुरात मुख्य महाविद्यालयाअंतर्गत अशा प्रकारे शिक्षणाचे धडे देण्यास सुरुवात झाली असून काही अपवाद वगळता याला विद्यार्थ्यांचा प्रतिसादही मिळत आहे. 'नीट'च्या तोंडावर दयानंद महाविद्यालयात ऑनलाइनद्वारे शिक्षणाला सुरुवात झाली आहे.
काळाच्या ओघात बदल हा अपेक्षित आहे. परंतु, कोरोनामुळे ही वेळ येऊन ठेपली असून अशा अत्याधुनिक पद्धतीला सुरुवात झाली आहे. शिक्षणाच्या दृष्टीने लातूर शहराला एक वेगळे महत्व आहे. नियमित शिक्षणापेक्षा क्लासेससाठी शहरात परजिल्ह्यातूनच नव्हे तर, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातूनही विद्यार्थी दाखल होत असतात. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील क्लासेस बंद असून महाविद्यालयांनीही ऑनलाइन शिक्षणाचे धडे देण्याचे धोरण ठरवले असून, प्रत्यक्षात याला सुरुवात झाली आहे. एकाच वेळी 200 ते 250 विद्यार्थी या सॉफ्टवेअरला जोडले जात आहेत.
सध्या दयानंद महाविद्यालयाअंतर्गत एकाच वेळी 90 ते 100 विद्यार्थ्यांना धडे दिले जात आहेत. महाविद्यालयातील वर्ग मोकळे असले तरी ऑनलाइनद्वारे शिक्षण हे विद्यार्थ्यांना दिले जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेटची अडचण येत असली तरी विद्यार्थ्यांना आवश्यक ते स्रोत पुरवले जात आहेत. शिवाय विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निरसन करण्यासाठी स्वतंत्र वर्ग घेतला जात आहे.
प्रायोगिक तत्त्वावर ही पद्धती राबवली जात असली तरी याचा फायदा हा विद्यार्थ्यांना होऊ लागला आहे. महाविद्यालयात नेहमीप्रमाणे वर्ग भरत आहेत. फरक फक्त एवढाच आहे की या वर्गात विद्यार्थी नसतानाही शिक्षक शिक्षणाचे धडे देत आहेत.