लातूर - शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी छावा संघटनेने गेल्या पाच दिवसांपासून औसा येथील तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला संपूर्ण जिल्ह्यातून पाठिंबा मिळत असून, संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून सरकारचा निषेध करण्यात आला. राज्य सरकारच्या निषेधार्थ शेतकरी व प्रहार संघटनेच्या वतीनेही यावेळी निदर्शने करण्यात आली आहेत.
मराठवाड्यातील शेतकरी अनेक अडचणींचा सामना करत असून, पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामात पेरण्या कमी झाल्या आहेत. गतवर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यंदाही दुष्काळसदृष्य परिस्थिती असताना सरकारकडून उपाययोजनांबाबत दुर्लक्ष होत आहे. यामुळे छावा संघटना आक्रमक झाली आहे.
सध्याच्या दुष्काळाचे निकष लावून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत देण्यासोबत १०० टक्के पीकविमा रक्कम मिळावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. तसेच दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचनात १०० टक्के अनुदान व वीजबिल माफ करण्यासारख्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी छावा संघटनेने आमरण उपोषण सुरू केले आहे.
छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे हे सहकाऱ्यांसमावेत उपोषणाला बसले असून, त्यांच्यातर्फे तहसीलदारांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही दखल घेण्यात आली नाही.