लातूर - शहरातील शाखा क्रमांक ५ येथे कार्यरत आलेल्या सहायक अभियंत्यास तंत्रज्ञ शाखेतील कर्मचाऱ्यानेच मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी (दि. 3) घडला आहे. याप्रकरणी १३ जणांविरोधात गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर १३ कर्मचाऱ्यांचे निलंबन कार्यकारी अभियंता यांनी केले. तर सहायक अभियंत्यानेच तंत्रज्ञास मारहाण केल्याचा आरोप करत कर्मचारी संघटनेने आंदोलन केले.
गोविंद तुकाराम सर्जे हे शहरातील शाखा क्रमांक ५ येथे सहायक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. तर याच शाखेत पी.सी. बागडे हे तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होते. मात्र, कार्यालयीन वेळेतही सतत गैरहजर राहत असल्याने सहायक अभियंता सर्जे यांनी त्याची गैरहजेरी मांडली होती. त्याचाच राग मनात धरून बागडेंसह इलेक्ट्रिसिटी लाइन्स्टाफ असोसिएशनच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना उपविभागीय कार्यालयात मारहाण केली.
याप्रकरणी पी.सी.बागडेसह ए. व्ही. गाढवे, हरिदास कोळी, रवी घोडके, विकास कातळे, एस. बी. फुंदे, माधव सूर्यवंशी यांच्यासह इतर ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सर्जे यांनी तीन दिवसांपूर्वीच शिवाजीनगर ठाण्यात बागडे यांच्याविरोधात तक्रार नोंद केली होती. याचाच राग मनात धरून त्याने इतर कर्मचाऱ्यांना हाताशी धरून सर्जे हे उपविभागीय कार्यालयात काम करत असताना मारहाण केली. यानंतर कर्मचारी संघटनेच्या वतीनेही मुख्य कार्यालयासमोर आंदोलन सुरू करण्यात आले आहे. शिवाय अभियंत्यानेच मारहाण केल्याचा आरोप हे कर्मचारी करीत आहेत. मात्र, सहायक अभियंत्यास थेट कार्यालयात घुसून मारहाण केल्याने इतर अधिकाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा - विविध मागण्यासांठी अंगणवाडी मदतनीसांचे निलंगा येथे आंदोलन