लातूर - संचारबंदी लागू असतानाही अनेक जण मॉर्निंग वॉकला जात होते. पोलीस प्रशासनाने अनेक वेळा सूचना करूनही नागरिकांची रस्त्यावरील गर्दी कमी होत नसल्याने अखेर आज (दि. 2 एप्रिल) 120 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून या सर्वांना शिवाजी नगर ठाण्यात नेण्यात आले होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असे असतानाही सकाळच्या प्रहरी कोण कारवाई करणार या अविर्भावात औसा रोड, रिंग रोडवर लातूरकर मॉर्निंग वॉकसाठी जात होते. बुधवारी (दि 1 एप्रिल) जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनीच सहा जणांवर कारवाई केल्यानंतर आज (गुरूवार) सकाळी शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच महानगपालिकेचे अधिकारी यांनी औसा रोडवर मॉर्निंग वॉकला आलेल्या तब्बल 120 जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये १० महिला असून ११० हे पुरूष आहेत. या सर्वांवर भा.दं. वि.चे कलम 188, 269, 270 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
औसा येथे ठाण्यातच सूर्यनमस्कार
औसा शहरात मॉर्निंग वॉकला फिरत असतानाचे औसा पोलिसांनी पकडून ठाण्यात आणले आहे. नागरिकांना कोरोनाच्या धोक्याबद्दल गांभीर्य बाळगण्याचे आवाहन करत पोलीस ठाण्यात सूर्यनमस्कार व अन्य व्यायाम करायला लावला. त्यांच्यावर भा.दं. वि.चे कलम १८८ अंतर्गत कारवाई केली आहे.
हेही वाचा - कोरोनाच्या धास्तीने गावाकडे गेले अन् २५ तोळे सोने गमावून बसले