लातूर - शैक्षणिक वर्षाचा पाया भक्कम करण्यासाठी 'फाऊंडेशन' कोर्स तर मेडिकल आणि आयआयटीला प्रवेश मिळावा याकरता असलेल्या क्रॅश कोर्ससाठी लातुरात दरवर्षी हजारोंच्या संख्येने विद्यार्थी दाखल होत असतात. मात्र, यावर्षी कोरोनामुळे ओढावलेल्या परस्थितीने विद्यार्थी शहराकडे फिरकले नाहीत. यावर पर्याय म्हणून ऑनलाईन क्लासेस आणि शाळेचा पर्याय निवडण्यात आला. मात्र, यातही तांत्रिक अडचणी आणि येत असलेल्या मर्यादांमुळे हा प्रयोग पूर्णपणे यशस्वी ठराना दिसत नाही. तेव्हा यावर्षी शैक्षणिक वर्षाचे फाऊंडेशनच बिघडल्याचे दिसत आहे.
परिणामी ज्या कोर्ससाठी 15 हजार रुपये घेतले जात होते, तिथे आता एक हजारात ऑनलाईनद्वारे शिकवण्याची नामुष्की क्लासेसवर आली आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे होणारी कोट्यवधींची उलाढालही ठप्प आहे.
कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा परिणाम सर्वच क्षेत्रावर झालेला आहे. मात्र, लातुरात क्लासेससाठी विद्यार्थी येऊ शकले नाहीत असे शिक्षण क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच घडले आहे. विद्यार्थ्यांचा प्रवेश कोणत्याही महाविद्यालयात असेल मात्र, फाऊंडेशन कोर्ससाठी लातूरलाच पसंती दिली जाते. शिवाय क्रॅश कोर्ससाठीही 20 हजारहून अधिक शहरात दाखल होतात.
हेही वाचा.. पंतप्रधानांनी भारताचा भूभाग चीनच्या हवाली केलायं; राहुल गांधींची नरेंद्र मोदींवर टीका
यावर्षी फाऊंडेशन कोर्स सुरू होण्यापूर्वी आणि क्रॅश कोर्सला नुकतीच सुरवात होताच लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्यामुळे रिलायन्स करिअर अकॅडमी असेल किंवा प्रमुख महाविद्यालये यांनी ऑनलाईनद्वारे शिक्षणाचे धडे दिले. मात्र, ही संख्या केवळ बोटावर मोजण्या एवढी आहे. दरवर्षी लहान मोठ्या अशा शहरातील 250 क्लासेसमध्ये 20 ते 25 हजार विद्यार्थी या दोन्ही कोर्ससाठी दाखल होतात. त्यामुळे सुट्टी हा प्रकारच लातूरने कधी पहिला नाही. मात्र, क्लासेस परिसर आणि आणि महाविद्यालयात यावर्षी अंतिमतः कमालीचा शुकशुकाट होता.
वर्गात विद्यार्थी नाहीत पण ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून ज्ञानार्जनाचे काम करण्यात आले. मात्र, त्याला मर्यादा आल्या आणि प्रत्यक्षात दिले जाणारे शिक्षणाचे धडे व ऑनलाईनद्वारे झालेले क्लासेस, यामध्ये खूप मोठा फरक असल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. शिवाय 20 हजार विद्यार्थी शहरात दाखल होत असल्याने त्यांच्या मूलभूत गरजा, जसे की हॉस्टेल, लहान मोठे व्यवसाय या परिसरात कायम गजबज असायची. विद्यार्थीच शहरात नसल्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प आहे.
हेही वाचा... मुंबई २६/११ हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेत अटक
ऑनलाईनमुळे मनुष्यबळही कमी झाल्याने अनेक शिक्षकांना घरी बसण्याची वेळ आली आहे. तर दोन महिने विद्यार्थी शहरात राहिला तर कोर्ससाठी 15 हजार आणि होस्टेलसाठी 10 हजार मोजावे लागत होते. ही उलाढाल पूर्णपणे ठप्प आहे. विद्यार्थ्यांची नाळ कायम राहावी म्हणून अनेकांनी ऑनलाईन क्लासेस घेतले आहेत. पण याचा प्रत्यक्ष रिझल्ट काय हे तर आगामी महिन्यात होणाऱ्या जेईई आणि नीट परिक्षेनंतरच समोर येईल. या प्रतिकूल परिस्थितीत रिलायन्स आणि इतर मोजक्या क्लासेसने ही ऑनलाईन प्रक्रिया सुरू ठेवली असली तरी जवळपास 200 क्लासेस हे यंदा बंद होते. त्यामुळे लॉकडाऊनचा परिणाम शैक्षणिक वर्षावर तर होणार आहेच शिवाय लातूरच्या अर्थकारणवरही झाला आहेस, हे नक्की.