लातूर - भविष्यात मराठा समाजाची भूमिका मूक मोर्चासारखी नाही तर ठोक राहणार आहे. त्याचअनुषंगाने 16 सप्टेंबरपासून जिल्ह्यातील आमदार, खासदार यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया मराठा समाजाचे भगवान मकने यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर आता जिल्ह्याच्या ठिकाणी मराठा समाजाच्या बैठका पार पडत आहेत. आता मराठा समाज आपली भूमिका स्पष्ट करू लागला आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्याच्या ठिकाणी बैठका पार पडत आहेत. रविवारी समाजातील नागरिकांनी एका मंगल कार्यालयात बैठक घेतली. आतापर्यंत राजकीय नेत्यांनी आरक्षणाकडे दुर्लक्ष केले आहे. ज्या समाजाच्या नावाने मताचा जोगवा मागितला. मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. त्याच समाजाच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे, हे दुर्दैव आहे. भविष्यात आता तरूणांनी आत्महत्येसारखा विचार न करता लढण्याची भूमिका घ्यायला पाहिजे, असा सूर या बैठकीत उमटला. तसेच 16 सप्टेंबरपासून जिल्ह्यातील आमदार, खासदार यांच्या घरासमोर घंटानाद केला जाणार आहे. याची सुरुवात पालकमंत्री अमित देशमुख यांच्यापासून केली जाणार आहे. माजी पालकमंत्री यांच्या घरासमोरही आंदोलन केले जाणार आहे.
हेही वाचा - मराठा आरक्षण प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल धक्कादायक - अशोक चव्हाण
रविवारी पार पडलेल्या बैठकीत समाजातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांच्या सूचनांची नोंद यावेळी घेण्यात आली आणि आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरुच राहणार आहे, असे मत अनेकांनी मांडले.