लातूर - अखेर महिन्याभरानंतर सत्ता स्थापनेचा तिढा सुटला असून मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. अनेक घडामोडीनंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. आता स्थानिक पातळीवर या महाविकास आघाडीचे कसे परिणाम होणार, काय असणार गणिते याची चर्चा रंगू लागली आहे. मात्र, लातुरात वेगळेच चित्र आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे अस्तित्व नावालाच असून स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये एकही प्रतिनिधी या पक्षाचा नाही. विधानसभा निवडणुकीत केवळ एक जागा या पक्षाच्या वतीने लढविण्यात आली होती. या ठिकाणीही दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे मुख्यमंत्री पदी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विराजमान झाले असले तरी जिल्ह्यात मात्र, आघाडीतील काँग्रेस- राष्ट्रवादीलाच याचा अधिक लाभ होणार आहे.
शिवसेना आणि लातूरचे गणित कधी जुळलेच नाही. केवळ औसा अहमदपूर आणि चाकूर तालुका वगळता इतर सात तालुक्यांमध्ये पक्ष संघटनेचे काम होताना पाहवयास मिळालेले नाही. 70 नगरसेवक असलेल्या या शहर महानगपालिकेत शिवसेनेचा एकही नगरसेवक नाही तर जिल्हापरिषदेमध्येही एकही सदस्य नाही अशी अवस्था आहे. या पक्षाची विधानसभा निवडणुकीत लातुर ग्रामीण मधून शिवसेनेकडून सचिन देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांचा तब्बल 1 लाख 20 हजार मतांनी पराभव झाला होता. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन आमदार जिल्ह्यात आहेत. त्यामुळे आता पालकमंत्री कोण होणार आणि मंत्री पद कुणाला मिळणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांचा समावेश असला तरी लातुरात मात्र, आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाच लखलाभ होणार हे नक्की.