लातूर - उदगीर येथील धनवंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या गणेश म्हात्रे याने विष प्राशन करुन आत्महत्या केली. महाविद्यालयातील रॅगिंगला त्रासून गणेशने आत्महत्या केली. या घटनेला महाविद्यालय प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. तर हा प्रकार गणेशच्या मूळ गावी झाला, असून महाविद्यालयात रॅगिंगचे प्रकार होत नसल्याचे स्पष्टीकरण प्राचार्य डॉ. दत्ता पाटील यांनी दिले.
गणेश म्हात्रे हा उदगीर येथील धनवंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयातील बीएएमएसच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वी तो नाळवंडी या मूळ गावी गेला होता. शुक्रवारी त्याने विष प्राशन केले, उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. या घटनेला गणेशच्या नातेवाईकांनी धनवंतरी महाविद्यालयाच्या प्रधासनाला जबाबदार धरले आहे.
हेही वाचा - वैद्यकीय महाविद्यालयातील रॅगिंगला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या
महाविद्यालयात रॅगिंग होत असल्याची तक्रारही महाविद्यालयात केली होती, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे महाविद्यालयात रॅगिंगसारखे प्रकार होत नसल्याचे प्राचार्य डॉ. दत्ता पाटील यांनी स्पष्ट केले. गणेशने त्याच्या मूळगावी आत्महत्या केली आहे. त्यामुळे या मागे नेमके काय कारण आहे याबाबत साशंकता आहे. या घटनेला महाविद्यालयाला जबाबदार धरने चुकीचे आहे, असे प्राचार्य म्हणाले.
गणेशच्या आत्महत्येनंतर नातेवाईक आणि महाविद्यालय प्रशासन यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. बीड येथील शासकीय रुग्णालयाजवळील पोलीस ठाण्यात पी. के. ससाणे यांनी नातेवाईकांचे जवाब नोंदवून घेतले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.