लातूर - आठवड्याच्या सुरुवातीपासून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची विक्रमी आवक होत आहे. दिवसाकाठी एक ते दीड लाख क्विंटल सोयाबीन बाजार समितीमध्ये दाखल होत असल्याने एकच गर्दी होत होती. तर 12 तास थांबवूनही शेती मालाचा काटा होत नव्हता. त्यामुळे आता बाजार समितीच्या प्रशासनाने एक नियमावली जारी केली आहे. सकाळी 6 ते दुपारी 1 पर्यंतच प्रवेश दिला जाणार आहे. 'ईटीव्ही भारत'ने बाजार समितीमधील गर्दी आणि शेतकऱ्यांची गैरसोय यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते.
मराठवाड्यात लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीला विशेष महत्त्व आहे. उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यातूनच नव्हे तर कर्नाटकातूनही शेती मालाची आवक होत असते. यंदा सोयाबीनचे पावसाने नुकसान होऊनही बाजार समितीत दिवसाकाठी एक ते दीड लाख क्विंटलची आवक होत होती. त्यामुळे बाजार समितीसमोर तब्बल एक ते दीड किमी वाहनांच्या रांगा लागत होत्या. शिवाय शेतकऱ्यांनाही दिवसभर वाहनांमध्येच थांबावे लागत होते. गूळ मार्केट परिसरात वाहनांची कोंडी होत होती. अखेर बाजार समितीच्या प्रशासनाने यासंदर्भात एक नियमावली काढली आहे. सकाळी सहा ते दुपारी दीडपर्यंत शेतकऱ्यांची वाहने बाजार समितीमध्ये येण्यास परवानगी देण्यात आली आहे. दुपारी दोनवाजेनंतर पहाटे सहापर्यंत व्यापाऱ्यांना खरेदी केलेला मालाची वाहतूक करता येणार आहेत. शिवाय बाजार समितीच्या आवारात असलेल्या 4 गेटचा कसा वापर करायचा? यासंबंधीही सूचना करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - लातूर जिल्ह्यात चोरीचे सत्र सुरूच; चाकूचा धाक दाखवून उदगीरमध्ये वयोवृद्ध दाम्पत्यास लुटले
दिवाळी सणाच्या तोंडावर सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मध्यंतरी शेतकऱ्यांची गैरसोय होत असल्याचे वृत्त 'ईटीव्ही भारत'ने प्रकाशित केले होते. त्यानुसार ही नियमावली जारी करण्यात आली आहे. यानुसार आता नियमावलीची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
असा होणार बाजार समितीमधील 6 गेट्सचा वापर -
लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात एकूण 6 गेट्स आहेत. शेतकऱ्यांचा माल 2, 3, 5 आणि 6 या गेटमधून आतमध्ये येणार तर 1, 3, 4, 6 यामधून ही वाहने बाहेर काढली जाणार आहेत. व्यापाऱ्यांची वाहने 2, 3, 5 आणि 6 मधून आतमध्ये येणार आहेत. तर 1, 4, 6 गेटमधून ती बाहेर काढली जाणार आहेत.
शेती मालाची विक्री व्यवहार सुरळीत होण्यासाठी बाजार समितीचा पुढाकार -
बाजार समितीमधील गर्दी आणि शेतकऱ्यांचे होणारे हाल पाहता समितीच्या प्रशासनाच्या कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात होता. अखेर बाजार समितीचे सभापती ललित शहा, उपसभापती मनोज पाटील, प्रभारी सचिव सतीश भोसले यांनी हा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी शुक्रवार पासून अवलंबली जात आहे.