लातूर - आज गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे अनेकांनी आपापल्या पद्धतीने आपल्या गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. यावर्षी कोरोनाच्या सावटाखाली गुरुपौर्णिमा साजरी होत आहे. जिल्ह्यात औसा येथील एका महिलेने जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना गुरुस्थानी मानून गुरुपौर्णिमा साजरी केली. प्रियंका लद्दे असे या महिलेचे नाव आहे. त्यांनी शेतकऱ्यांना आवश्यक असणारी शेतीची औजारे, रेनकोट, सॅनिटायझर आदी वस्तू भेट देत कृतज्ञता व्यक्त केली आहे.
सतत निसर्गाच्या अवकृपेमुळे औसा तालुक्यातील शेतकरी संकटात असतो. मात्र, या संकटांचा सामना करुन पुन्हा खंबीरपणे उभे राहण्याची प्रेरणा शेतकरी देत असल्याची भावना प्रियंका यांनी व्यक्त केली. प्रियंका यांनी शेतकऱ्यांना गुरु मानत ५० शेतकऱ्यांना शेतात जाऊन शेतीच्या कामासाठी आवश्यक असलेले साहित्य भेट दिले. प्रियंका यांच्या अनोख्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मंदिरे बंद आहेत. त्यामुळे दरवर्षी दणक्यात आणि उत्साहात साजरा होणारा गुरुपौर्णिमा उत्सव शांततेत आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा होत आहे. शिर्डी, शेगाव, अक्कलकोट सारख्या धार्मिक स्थळांवर शुकशुकाट आहे.