लातूर : 'तु माझ्या वडिलांना शिव्या का दिल्या' असे म्हणत माळकोंडजी (ता. औसा) येथील एका पोलीस कर्मचाऱ्यास पाच जणांनी काठीने व लाथाबुक्क्यांने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी किल्लारी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेताजी बाबुराव जगताप (वय २७) असे जखमी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
माळकोंडजी गावातील एका दुकानासमोर पोलीस कर्मचारी नेताजी बाबुराव जगताप उभे होते. यावेळी इंद्रजित मगरसह समाधान मगर, रणजित मगर, अमर कदम व ज्ञानेश्वर कदम यांनी नेताजी जगताप यांना तु शिव्या का दिल्यास म्हणून शिविगाळ केली. तसेच, जगताप यांच्या डोक्यात खांद्यावर व पायावर काठीने मारहाण करून जखमी केले. तर, रणजित मगर यांनी जगताप यांच्या खिशातील रोख ४५ हजार २०० रुपये हिसकावून घेत जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेत नेताजी जगताप यांच्या खांद्याला जबर मारहाण झाल्याने त्यांना उपचारासाठी लातूर येथे दाखल करण्यात आले. याप्रकरणी जगताप यांच्या तक्रारीवरून इंद्रजित मगर, समाधान मगर, रणजित मगर, अमर कदम व ज्ञानेश्वर कदम यांच्याविरोधात किल्लारी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तर, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंडे करीत आहेत.
दरम्यान, किल्लारी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गावात अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणात (फोफोवली) बोकाळली असून यामधून गावागावात भांडणे वाढली आहेत. याकडे स्थानिक पोलीसाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे.
हेही वाचा - जिल्हापरिषदेचा 'अभिनव लातूर पॅटर्न' : ग्रामीण भागात शिक्षणाची जबाबदारी 'कोविड कॅप्टन' वर