लातूर - गेल्या रविवारपासून बेपत्ता असलेल्या एका सात वर्षीय लहान मुलाचा मृतदेह गुरधाळ येथील एका विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. याबाबत देवणी पोलिसात आकस्मात मृत्युची नोंद झाली आहे. वामन खंडेराव गायकवाड असे त्या मुलाचे नाव आहे.
हेही वाचा - नागपुरातील 'देवगिरी' जयंत पाटील, की अजित पवारांचे करणार स्वागत?
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रविवारी दुपारी ३ वाजता वामन खंडेराव गायकवाड (वय ७) हा गुरधाळ (ता.देवणी) येथील घरातून बेपत्ता झाला होता. सोशल मीडियावरूनही गेल्या दोन दिवसांपासून याबाबतची बातमी व्हायरल झाली होती. त्या बालकाचा मृतदेह मंगळवारी विनोद मोमले यांच्या विहिरीत आढळून आला. याबाबत मृताचे वडील खंडेराव वामन गायकवाड यांच्या तक्रारीवरून देवणी पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधिकारी एन.जी सुर्यवंशी करत आहेत.
नातेवाईकांचा घातपाताचा संशय, पण पोलिसात संशयित व्यक्तीच्या नावे तक्रार नाही -
घरात कोणी रागावला नसतानाही मुलगा बाहेर विहिरीजवळ गेला कसा? गेला तर विहिरीचे कठडे उंच असल्याने विहिरीत पडला कसा? की हा घातपात आहे? या संशयाची चर्चा असली तरी, तक्रारदारने संशयाचा उल्लेख आपल्या तक्रारीत केला नाही.
याबाबत देवणी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.