निलंगा (लातूर) - तालुक्यातील बोटूकुळ येथे शेतातील बांधावर सरपण टाकण्याच्या कारणावरून बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रुपांतर मोठ्या वादात झाले आणि दोन भावकीमध्ये कोयते- कुऱ्हाडीने हाणामारी झाली. त्यात पाच जण जखमी झाले असून एक जण गंभीर आहे.
निलंगा तालुक्यातील बोटकुळ गावातील शिवारात बालाजी सुभाष मोरे, राजेंद्र विठ्ठल मोरे व शांतकुमार प्रकाश मोरे व वामन भाऊराव मोरे, धनराज वामन मोरे यांची शेती आहे. आज सकाळी सामाईक बांधावर सरपण का ठेवले, यातून वाद झाला व दोन्ही गटांत कुऱ्हाडीने व कोयत्याने तुंबळ हाणामारी झाली, अशी माहिती औराद शा. पोलिसांनी दिली आहे.
कोयत्याने व कुऱ्हाडीने झालेल्या मारहाणीत धनराज मोरे यांच्या डोक्यात कोयत्याचा मार लागल्याने वीस टाके पडले आहेत. वामन मोरे याला कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारल्यामुळे उजवा हात फ्रॅक्चर झाला आहे. कुशावर्ता वामन मोरे यांच्याही डाव्या हाताला मार लागला आहे. या घटनेतील गंभीर जखमीवर निलंगा येथिल खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत.
बालाजी मोरे यांच्या छातीत इजा झाली आहे तर राजेंद्र मोरे याच्या डोक्यात मार लागला असून डाव्या हाताचे एक बोट तुटले असून शांतकुमार मोरे याच्या डोक्यात व बोटाला मार लागला आहे. सर्वजण बोटकुळ ता.निलंगा जि.लातूर येथील असून परस्परांच्या विरोधात औराद शा. पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आले आहेत. तथापि, अद्याप गुन्हे दाखल झालेले नाहीत.