लातूर - जिल्ह्याच्या उदगीर शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून हे शहर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरले आहे. शनिवारी आणखी 10 नव्या रुग्णांची भर पडल्यानंतर रविवारी दुपारी ६५ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
लातूर जिल्ह्यातील एकट्या उदगीर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. शनिवारी मुबंईहुन परतलेल्या तब्बल 10 जणांना कोरोनाची लागण असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे 19 जणांवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी दुपारी 12 च्या दरम्यान या ६५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबरोबरच या रुग्णाला उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे आजारही होते. यामुळेच या वयोवृद्ध रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी दिली. हा जिल्ह्यातील कोरोनाचा दुसरा बळी ठरला असून त्यामुळे प्रशासनासह उदगीरकारांच्या चिंतेत भर पडत आहे.
आत्तापर्यंत जिल्ह्यात 49 कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी 29 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज मिळाला असून 18 जणांवर उपचार सुरू आहेत. तर आत्तापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे.