लातूर - राजकारणात हार-जीत ही कधी कोणाची होईल हे सांगता येत नाही. लोकनेता...जननायक...अशा अनेक उपाधी असणाऱ्या दिवंगत विलासराव देशमुख यांनाही १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता. प्रतिस्पर्धी होते जनता दलाचे शिवाजी पाटील कव्हेकर. सलग तीन टर्म विजयी राहिलेले विलासराव देशमुख यांनी मंत्री, कॅबिनेट मंत्री पद भूषवले होते. असे असतानाही पराभव झालेली ही निवडणूक आजही लातूरकरांच्या आठवणीत कायम आहे.
हेही वाचा - रोहित पवारांबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
राज्याच्या राजकारणात आपल्या शैलीमुळे विलासराव देशमुख यांचा वेगळा ठसा होता. विरोधकही त्यांचे मित्र होते. लातूर शहर आणि लातूर ग्रामीण हा त्यांचा बालेकिल्ला. मात्र, १९९५ सालच्या विधानसभा निवडणुकीत जनता दलाचे शिवाजी पाटील कव्हेकर यांनी त्यांचा तब्बल ३२ हजार मतांनी पराभव केला होता. हा पराभव विलासराव देशमुख यांनीही मोठ्या मनाने स्वीकारला होता.
त्याचे झाले असे शिवाजी पाटील कव्हेकर हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती होते. त्या दरम्यान त्यांनी हमाल-माथाडी यांचे प्रश्न मार्गी लावून एक वलय निर्माण केले होते. शिवाय जातीय समीकरनेही या निवडणुकीत प्रभावशाली ठरली होती. या निवडणुकीत शिवाजी पाटील कव्हेकर यांच्या प्रचारार्थ बापूसाहेब काळदाते हे ठाण मांडून होते तर, जनता दलाचे रामविलास पासवान यांनी टाऊन हॉल येथे घेतलेली सभा ही या निवडणुकीतील टर्निंग पॉईंट ठरली होती. या शेवटच्या सभेत पासवान यांनी कव्हेकरांचा विजयच घोषित केला होता. याशिवाय जॉर्ज फर्नाडिस याचीही सभा लातुरात झाली होती.
हेही वाचा - काँग्रेसने उमेदवारी दिलेले 'हे ' माजी मंत्री पुन्हा गाठणार का विधानसभा?
मतदारांमधील नाराजी आणि जनतेमध्ये जाऊन प्रश्नाची केलेली उकल यामुळे विजय होणार, असा विश्वास शिवाजी पाटील कव्हेकर यांनाही होताच. त्यामुळेच १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत राज्याच्या मुख्यमंत्री पदी राहिलेल्या विलासराव देशमुख यांचाही पराभव झाला होता. हे सर्व होऊनही शिवाजी पाटील कव्हेकर हे त्यांच्या भेटीसाठी मुंबई येथे गेले होते. विरोधक नाही तर एक लातूरकर म्हणून विलासराव देशमुख यांनी त्यांचे स्वतःच्या शैलीत स्वागतही केले होते.
त्यानंतर विलासरावांनी कधीही पराभव पहिला नाही. सर्वात जास्त कालावधीचे मुख्यमंत्री म्हणून ते राहिले होते. शिवाय केंद्रीय मंत्रीपदीही त्यांची वर्णी लागली होती.
'मामुली' विधानाचा परिणाम-
एका सभेदरम्यान विलासराव देशमुख यांनी 'कुछ मामुली लोग मेरे खिलाफ है', असा उल्लेख केला होता. यावरून विरोधकांनी काही जातींना (मारवाडी, मुस्लीम, लिंगायत) संबोधून विलासराव देशमुख यांनी हे विधान केल्याचा प्रचार केला. तसेच त्यांच्याविषयी मतदारांची भूमिकाही नकारात्मक झाली होती. याचाही परिणाम या निवडणुकीवर झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.