कोल्हापूर - गव्याच्या हल्ल्यात करवीर तालुक्यातील भुयेवाडीतील तरुणाचा मृत्यू ( Youth Died in Gaur attack ) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील सौरभ संभाजी खोत (वय 24 वर्षे), असे या तरुणाचे नाव आहे. शेतात गवा पाहण्यासाठी गेल्याल्या युवकांवर गव्याने हल्ला केला. यात सौरभचा जागीच मृत्यू झाला तर आणखी दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
दोन दिवसांपासून कोल्हापुरात गवा :
दरम्यान, दोन दिवसांपासून कोल्हापूर शहरातील काही भागात गव्याचा वावर पाहायला मिळाला होता. गव्याच्या कळापातून भरटकलेला गवा रात्री कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरून पुढे वडणगेकडे गेल्याचे पाहायला मिळाले होते. शुक्रवारी सायंकाळीही येथील भुयेवाडी भागात गवा आल्याची माहिती पसरली. त्यानंतर अनेक जण गव्याला पाहायला गेले होते. याच दरम्यान, गव्याने केलेल्या हल्ल्यात सौरभ संभाजी खोत याचा जागीच मृत्यू झाला आहे. सौरभ हा माजी सरपंच पूजा खोत आणि विद्यमान सदस्य संभाजी खोत यांचा एकुलता मुलगा होता.
गव्याचा अनेक भागांत वावर; नागरिकांनी सावधगिरी बाळगा :
दरम्यान, जिल्ह्यात गव्याचा वावर असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली होती. त्यामुळे शहरातील लोकही गवा पाहण्यासाठी पंचगंगा घाटावर आले होते. मात्र, वनविभागाने संपूर्ण परिसर सील करून नागरिकांना बाजूला केले. शिवाय गव्याला शहरापासून लांब केले होते. त्यानंतर गवा हा शांत प्राणी असून त्याला कोणीही त्रास देऊ नये तो त्याच्या मार्गाने जात असतो, असे आवाहनही वन विभागाने केले होते. मात्र, भुयेवाडी येथील तरुणाचा गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. दरम्यान, घडलेल्या या घटनेनंतर सर्वत्र भीतिचे वातावरण पसरले आहे.
हे ही वाचा - Crowds of citizens to see Bison Kolhapur : कोल्हापूरात गवा घुसला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी