कोल्हापूर - मराठा आरक्षणासाठी शाहू नगरीतील रणरागिणी एकवटल्या आहेत. आज कोल्हापूरच्या मिरजकर तिकटी येथे महिलांनी एकत्र येऊन आंदोलन केले. मराठा समाजाच्या आरक्षणाचे राजकारण न करता न्याय देण्याची मागणी यावेळी या महिलांकडून करण्यात आली. आरक्षणाबाबत योग्य निर्णय न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा या महिलांच्यावतीने देण्यात आाला.
'मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने ताकदीनिशी प्रयत्न करावे'
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने मराठा समाजातील नागरिकांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारबद्दल तीव्र नाराजी आहे. काहीही करा, पण आरक्षण द्या, अशी भूमिका घेऊन आता मराठा समाज रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूरात सर्वपक्षीय महिला संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. मिरजकर तिकटी येथे रस्त्यावरच हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी आपली भूमिका मांडली. मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने ताकदीनिशी प्रयत्न करावे. लोकप्रतिनिधी आमदार, खासदार यांनी विधानसभा व लोकसभेत आवाज उठवावा. तसेच मराठा आरक्षणात खोडा घालणाऱ्याचा यावेळी महिलांनी निषेध केला. दरम्यान, राज्य सरकारने ४ जून पूर्वी मराठा आरक्षणाच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दखल करावी, अशी मागणी महिलांनी केली आहे. आरक्षणाबाबत योग्य निर्णय न झाल्यास येणाऱ्या काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी महिलांनी दिला.
यापूर्वीही महिलांचे आंदोलन व पाठिंबा -
यापूर्वीही महिलांनी मराठा आरक्षणा संदर्भात विविध आंदोलन पुकारले आहेत. तसेच या आंदोलनांद्वारे राज्य सरकारला इशारा देण्याचा प्रयत्न केला होता. कोल्हापूरमधील दसरा चौक येथे सुरू झालेल्या ठोक मोर्चाला जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी पाठिंबा दिला होती. तसेच राज्य सरकारला 'आरक्षण द्या, नाहीतर खुर्ची खाली करा', असा इशारा दिला होता. तर आताही सर्व पक्षीय महिलांनी एकत्र येऊन कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथे आंदोलन पुकारला आहे.
मराठा क्रांती मोर्चाला लक्षणीय सहभाग -
मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी कोल्हापुरात लाखोंच्या उपस्थितीत भव्य मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला होता. त्याला जवळपास पाच वर्षे उलटली आहेत. या मोर्चात महिलांचा लक्षणीय सहभाग होता. डोक्याला भगवे फेटे, अंगावर काळे टी-शर्ट परिधान करून महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. तसेच महिलांनी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. विशेष म्हणजे या क्रांती मोर्चा वेळी महिलांनी पुढाकार घेऊन आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते.
हेही वाचा - ....तेव्हा सरकारमधील मंत्री मोर्चे काढण्यात मग्न होते - देवेंद्र फडणवीस