कोल्हापूर - लॉकडाऊन काळातील वीज बिल भरणार नाही. महावितरणकडून सक्तीने वीज बिल वसुली सुरू झाल्यास जशाच तसे उत्तर देऊ. राज्य सरकारमध्ये हिंमत असेल तर सर्वसामान्य जनतेची वीज तोडून दाखवा, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे. आज इचलकरंजी येथे सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने वीजबील वाढीविरोधात मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
इचलकरंजी येथे सर्वपक्षीय कृती समितीच्या मोर्चात बोलताना राजू शेट्टी लॉकडाऊन काळातील विजबिल माफ करावे, यासाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहेत. वीजबिलात दरवाढ झाल्याने राज्यभरात सर्वसामान्य जनतेमध्ये राज्य सरकारच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. तीन महिने रोजगार बंद असल्याने लाईट बिल कुठून भरू? असा सवाल सर्वसामान्य जनतेने केला आहे. लॉकडाऊन काळातील बिल माफ व्हावे, अशी मागणी सर्वसामान्य जनतेने केली आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने विज बिल माफीसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, वीज तज्ञ प्रताप होगाडे, आमदार प्रकाश आवाडे, प्रसाद कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. इचलकरंजी येथील गांधी पुतळा चौकातून या मोर्चाला सुरुवात होऊन तो प्रांत कार्यालयावर धडकला. यावेळी राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले.दिवाळीची गोड बातमी आलीच नाही -
100 युनिट पर्यंत वीज बिल माफ करू, अशी घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली होती. तर दिवाळीत गोड बातमी सर्वसामान्य जनतेला देऊ, असे आश्वासन देखील महाविकास आघाडी सरकारने जनतेला दिलं होतं. मात्र या उलट भूमिका घेत सक्तीने वीज बिल वसूल करू, अशी भाषा राज्य सरकारने केली. येणाऱ्या काळात विज बिल माफ झाली पाहिजेत, अन्यथा रस्त्यावरची लढाई सुरूच राहील, असा इशारा देखील राजू शेट्टी यांनी दिला.
लॉकडाऊन काळात केंद्राची मदत, राज्य सरकारनं काय केलं?
लॉकडाऊन काळात जनतेला केंद्र सरकारने आर्थिक पॅकेजसह धान्य वाटप केले. जनतेची उपासमार होऊ नये म्हणून रेशनिंगच्या माध्यमातून घरोघरी मोफत धान्य पोहोच केले. मात्र राज्य सरकारने लॉकडाऊनच्या काळात कोणती मदत केली, असा सवाल करत माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. या तीन महिन्याच्या कालावधीत अनेकांचा संसार उघड्यावर आला, नोकऱ्या गेल्या अशा काळात वीजबिल कुठून भरणार? अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे.
खासदार धैर्यशील मानेचा यू-टर्न -
लॉकडाऊन काळातील वीज बिले माफ व्हावी, या मागणीसाठी इचलकरंजी शहरातील सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चाला शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने उपस्थित राहणार होते. सरकारचे घटक पक्ष असल्याने ते या मोर्चाला उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी ऐनवेळी यू- टर्न घेऊन शहरवासीयांच्या भावना दुखावल्याची चर्चा आंदोलनस्थळी होती.