कोल्हापूर - हजारो वर्षांपासून ऊन, वारा, पाऊस यांच्याशी लढणारे दुर्ग आज का ढासळत आहेत? गड संवर्धनाच्या नावाखाली सुरू असलेले कामे आणि त्यामुळे असलेला धोका, भविष्यात कशापद्धतीने पोहचू शकतो हानी? हजारो लोक गाढली जाऊ शकतात? ढासळणारे दुर्ग किल्ल्यांमुळे संस्कृती टिकेल का? इतिहास पुसला जाणार का? हे थांबवायचे असेल तर काय केले पाहिजे? या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजेत. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या गडकिल्ल्यावर आणि पायथ्याला धोक्याची घंटा वाजते. वेळीच सावध झालं तर जीवितहानी टळू शकते. काय आहे सगळ्यांमागे कारण? वाचा सविस्तर वृत्त
दुर्गबांधणीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी एक आज्ञापत्र लिहिले आहे. या आज्ञापत्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गा भोवती कलारगी झाडे जगवावीत असा उल्लेख केला आहे. दुर्ग नीतीमध्ये महामूर पडणारा पाऊस याची कलारगी झाडे मुळे थोपवतात. ती देशी वृक्ष बहुत यत्ने करून ही झाडे वाढवावी, असा उल्लेख शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रात आहे. कलारगी झाडे म्हणजे देशी झाड. त्यामध्ये आंबा, फणस यासह अनेक देशी वृक्षांचा समावेश आहे. ही झाडे जमिनीमध्ये पाणी धरून ठेवतात. माती घट्ट धरून ठेवतात. त्यामुळे किल्ल्यांच्या बांधणीला कोणत्याही प्रकारचा धोका पोहोचत नाही.
दुर्ग पर्यावरणाचा विसर?
फार पूर्वीपासून गडकिल्ले सह्याद्रीत तग धरून आहेत. मात्र आताच हे तटबंदी का ढासळत आहे. असा सवाल उपस्थित होतो. मात्र तत्कालीन गडकिल्ले बांधत असताना दुर्गावरील पर्यावरणाचा अभ्यास केला होता. ज्या दुर्गाच्या ठिकाणी देशी झाडांची संख्या होती. त्यामुळे दुर्ग आजही ऊन वारा पाऊस झेलत आहेत. मात्र अनेक गड-किल्ल्यांवर मानवी हस्तक्षेप झाला. तसेच किल्ल्यांवरची देशी झाडं नाहीशी झाली. दुर्गावरील वरील पर्यावरणाचा विसर पडला. त्याठिकाणी देशी वृक्ष न लावता विदेशी वृक्षांचा भरमसाठ झाला. त्यामुळेच भूस्खलनाची घटना घडत आहेत, असे मत तज्ज्ञांचे आहे.
दुर्ग संवर्धनाच्या नावाखाली चुकीची कामे
दुर्ग संवर्धनाचा प्रकार चुकीच्या पद्धतीने सुरू झाला आहे. दुर्गसंवर्धन हा चौथा प्रकार आहे. दुर्ग संवर्धन म्हणजे पडलेली तटबंदी नव्याने बांधणे म्हणजे गड संवर्धन नव्हे. मात्र ती बांधत असताना पूर्वीच्या काळी शास्त्रोक्त पद्धतीने केलेला विचार महत्त्वाचा आहे. त्यामुळे दुर्गसंवर्धन करत असताना त्याचा मास्टर प्लॅन तयार केला पाहिजे. तत्कालीन कालखंडातील बांधणीनुसार किल्ल्यांची पुनर्बांधणी करणे महत्त्वाचे आहे. त्यामागील शास्त्रीय बांधकाम, कला, संस्कृती आणि पर्यावरण याचा विचार केला पाहिजे. जर शास्त्रीय पद्धतीने बांधकाम नाही झाले तर गड किल्ल्यांचे अस्तित्व राहणार नाही. अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पूर्वीच्या काळी अतिवृष्टी झाल्यास गडाच्या तटबंदीतून पावसाचे पाणी निचरा होण्यासाठी विशिष्ट पद्धतीचे बांधकाम तटबंदीत पाहायला मिळत होती. मात्र गड संवर्धनाच्या नावाखाली पाण्याचा निचरा होण्यासाठी केलेली यंत्रणा मातीत गाढली गेली आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने ते पाणी तटबंदीमध्ये मुरत आहे. त्यामुळे माती ओलसर होऊन तटबंदी ढासळण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे गड संवर्धन करत असताना शास्त्रीय पद्धतीचा विचार करणे महत्त्वाचा आहे. राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाकडे महाराष्ट्रात किती गड-किल्ले आहे. त्याचा तपशील नाही ही धक्कादायक माहिती आहे. काही ठराविकच नोंदी महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाकडे आहेत हे दुर्दैवी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व गडकिल्ल्यांचे डॉक्युमेंटेशन होणे महत्त्वाचे आहे.
'धोक्याची घंटा वाजली.. गावेच्या गावे गाडली जातील'
सह्याद्रीची एक विशिष्ट रचना आहे. त्या रचनेनुसार आज महाराष्ट्रातील गड वैभव टिकून आहे. या सह्याद्रीच्या डोंगर कपाऱ्यात अनेक गड-किल्ले आजही तग धरून आहेत. मात्र पर्यावरणाच्या दृष्टीने विचार केला तर त्यानुसार गड किल्ल्यांची रचना अगदी योग्य आहे. मात्र गड-किल्ल्यांचा पर्यावरणाला धोका पोहोचवला तर त्याचा परिणाम हा गड पायथ्याशी असणाऱ्या गावांवर होऊ शकतो. जर गड किल्ल्यांवरील तटबंदी, डोंगर कोसळायला सुरुवात झाली तर, गडाच्या पायथ्याला असणारी गावच्या गाव गाडली जातील. त्यामुळे मनुष्य हानी मोठ्या प्रमाणात होऊ शकते. धोक्याची घंटा आता वाजली आहे. त्याकडे वेळीच लक्ष देणे महत्त्वाचे आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
मानवी हस्तक्षेप जबाबदार?
मनुष्य हानी आपण भरून काढू शकत नाही. मात्र आर्थिक हानी आपण भरून काढू शकतो. संस्कृतीची हानी देखील भरून काढू शकत नाही. त्यामुळे गड संवर्धन करत असताना दुर्गाच्या पर्यावरणाचा अभ्यास केला पाहिजे. दुर्गांची तटबंदी कोसळण्यास होणारी अतिवृष्टी जबाबदार नाही. कारण गेल्या साडेतीनशे वर्षापासून हे दुर्ग अतिवृष्टी पेक्षा जास्त ऊन, वारा, पाऊस झेलत आहेत. घडणाऱ्या घटनेला केवळ मानवाचा हस्तक्षेप व जबाबदार आहे. मानवाचे अशास्त्रीय बांधकाम हेच गड किल्ले उध्वस्त करण्याला कारणीभूत ठरतील, असे मतही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.