कोल्हापूर- भाजपने केलेले दुर्लक्ष आणि राजकारणातील आपले महत्व कमी होऊ लागल्याने पुन्हा एकदा स्वाभिमानिशी हातमिळवणी करण्याची भाषा सदाभाऊं खोत यांनी केली. मात्र, राजू शेट्टी यांच्या प्रतिक्रियेमुळे सदाभाऊंचे सर्वच डावपेच हाणून पडले. यातून सदाभाऊंनी काय साध्य केले, याचा आढावा घेणारा ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट.
काय म्हणाले होते सदाभाऊ खोत-
राजकारणात कोणीही एकमेकांचा कायमचा शत्रू किंव्हा मित्र नसतो. शेतकऱ्यांंच्या प्रश्नांवरती राजू शेट्टी आणि आमची भूमिका एक आहे. भविष्यात शेतकऱ्यांसाठी आम्ही एकत्र येऊ, असे संकेत खोत यांनी दिले होते. आज राजू शेट्टी आणि माझ्यात जी दरी आहे. ती राजकीय पटलावर कोणाची बाजू घ्यायची यावरून निर्माण झाली आहे. पण राजू शेट्टींनी प्रस्थापितांची संगत सोडून जर विस्थापितांची बाजू घेत, साखर सम्राटांच्या विरोधात सर्व सामान्यांच्या बाजूने लढा हातात घेतल्यास सदाभाऊ खोत शेट्टींना पुन्हा खांद्यावर घ्यायला तयार आहे, अशी साद खोत यांनी शेट्टींना घातली होती.
स्वच्छ हात आणि स्वच्छ चारित्र्य असणाऱ्या लोकांनाच स्वाभिमानी शेतकरी संघटना जवळ करते. ज्यांना समिती नेमून पक्षातून हाकलून लावले, त्यांना पुन्हा संघटनेत घेण्याचा प्रश्नच येत नाही. सदाभाऊ यांच्याकडे स्वच्छ चारित्र्यही नाही आणि स्वच्छ हातही नाहीत, अशी टीकात्मक प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
गेल्या पाच वर्षांपूर्वी सदाभाऊंनी भाजपसोबत चूल मांडली होती. मात्र, सत्ता नसताना सदाभाऊ खोत यांना आपल्या राजकारणातील अस्तित्वाची जाणीव झाल्याने ते पुन्हा एकदा राजू शेट्टी यांच्याशी स्नेहबंध जुळवून घेण्याची भाषा करू लागले. त्यामुळे राजकारणात पुन्हा एकदा चर्चेत येऊन आघाडी मिळवण्याच्या प्रयत्नात होते. त्याशिवाय भाजपवर दबाव टाकत आणखीन एखादे पद किंवा राजकारणातील महत्त्वाचे स्थान पदरात पाडून घेण्याची धडपड होती. मात्र, सदाभाऊंच्या या चालीच्या उलट चाल करत राजू शेट्टी यांनी त्यांच्या विरोधात प्रतिक्रिया देऊन सदाभाऊची हवा काढून घेतली. पुणे पदवीधर मतदारसंघावरून झालेल्या राजकारणामुळे सदाभाऊ खोत यांना पुन्हा जुन्या मित्राची आठवण झाली असली, तरी शेट्टी हे कोणत्याही मनस्थितीत पुन्हा सदाभाऊंशी गट्टी नको, याच स्थितीत आहेत. त्यामुळे राजकारणात स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर भाजपाला शरण जाण्याशिवाय पर्याय नव्हता, हे सदाभाऊंना ध्यानात आले. त्यामुळे त्यांच्यावर पुणे पदवीधर मतदार संघातून रयत क्रांती संघटनेचा उमेदवाराला माघार घेण्याची वेळ आली.
भाजपचा सदाभाऊंच्याकडे कानाडोळा-
पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून सदाभाऊंना विचारात घेतले नसल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी अनेकांसमोर नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे सदाभाऊंबद्दल भाजपच्या गोटात नाराजी असल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारने कृषी कायद्याच्या समर्थनार्थ प्रचार आणि प्रसारासाठी प्रभावी वातावरण सदाभाऊ खोत तयार करू शकले नाही. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातच टिपणी केल्याबद्दल भाजपच्या एका गटाची नाराजी ओढवून घेतली. तसेच केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध म्हणून महाविकास आघाडीने राज्यात बंदी घातली. त्यावेळी देखील महाविकास आघाडीच्या विरोधात प्रचार करू शकले नसल्याचे भाजपचे गोटात चर्चा सुरू आहे. त्यामुळे भाजप सदाभाऊंकडे कानाडोळा करत असल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहे.
शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी काम करावे-
राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची बारकाईने जाणीव आहे. एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा त्यांनी शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी पुढे येऊन काम करावे, असे मत देखील राजकीय विश्लेषक दयानंद लिपारे व्यक्त केले आहे. उसाची एफआरपी, शेतकऱ्यांच्या मालाचा हमीभाव यासाठी काम करावे, असेही ते म्हणाले.
पुणे पदवीधर मतदार संघाच्या उमेदवारीवरून भाजपला इशारा देऊन सदाभाऊ खोत यांना भाजपच्या गोटात आपले महत्त्व अधिक करण्याच्या हालचाली सुरू ठेवल्या होत्या. मात्र, राजू शेट्टींच्या या प्रतिक्रियेमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील परतीचे दोर कधीच कापले असल्याचे लक्षात येताच सदाभाऊ खोत पुन्हा एकदा भाजपला शरण गेले. त्यामुळे सदाभाऊंनी व्यक्त केलेली इच्छा ही फक्त केवळ चर्चाच राहिली.