कोल्हापूर- रामजन्मभूमी-बाबरीच्या जागेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करू. जिल्ह्यात बंधूभाव राखत कायदा व सुव्यवस्था अबाधीत धेऊ, असा सामाजिकतेचा संदेश जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत सर्वांनीच दिला आहे.
रामजन्मभूमी-बाबरीच्या जागेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून लवकरच निकाल देण्यात येणार आहे. त्याच बरोबर ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक शांतता व सुव्यवस्थेबाबत श्री शाहू स्मारक येथे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक पार पडली. या बैठकीला खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रकांत जाधव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
दिवाणी न्यायालयाचा निकाल सर्वांनी स्वीकारला पाहीजे. त्याच्यावर कोणतीही टिकाटिपणी होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यायला हवी. राजर्षी शाहू महाराजांनी न्यायाचा संदेश जगाला दिला आहे. याच विचारांचा वारसा आपण ठेवू, असा संदेश जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत देण्यात आला. या बैठकीला जिल्ह्यातील विविध पक्षाचे, संघटनेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.