कोल्हापूर- राज्याच्या हितासाठी आजही आम्ही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत. भाजपचे केंद्रीय नेतृत्व ठरवणार असेल तर आम्ही एकत्र सरकार बनवू, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून कालपर्यंत शिवसेनेवर टीका करणारे चंद्रकांत पाटील सेनेसोबत सरकार बनवायला कसे तयार होत आहेत, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
याबाबत 'ईटीव्ही भारत'शी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, सोमवारी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून महाराष्ट्र भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पार पाडली. यावेळी त्यांनी सर्वच पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, आता महाराष्ट्रात आपण स्वतःच्या जोरावर आपलं सरकार बनवायचे आहे. त्यामुळे सर्वांनी 144 जागांवर निवडून येण्यासाठी आत्तापासूनच तयारीला लागा असे त्यांनी म्हंटले होते. त्यालाच अनुसरुन मी म्हणालो की, आम्ही यापुढे आता सर्वच निवडणुका वेगवेगळ्या लढवणार आहोत आणि त्यानंतर एकत्र येऊ. पण आता अजूनही या सरकारला 4 वर्षे आहेत. त्यामुळे जर केंद्रीय नेतृत्वाने ठरवले आणि शिवसेनेना सुद्धा तसे म्हणणार असेल तर आम्ही महाराष्ट्रात सरकार एकत्र बनवू.
महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधताना पाटिल म्हणाले, आत्ताचे सरकार महाराष्ट्राचे हित पाहत नाही. चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्याला सुद्धा यावर निबंध लिहायला सांगितला तर तो सुद्धा त्यामध्ये हेच लिहिल. शिवाय जर एकत्र यायचे ठरलेच तर मुख्यमंत्री पदाबाबत काय, असे विचारले असता आमचे केंद्रीय नेतृत्व आणि उद्धव ठाकरे मिळून ते ठरवतील असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने मात्र सर्वत्र खळबळ माजली असून महाराष्ट्रातील राजकारणात आता आणखी काय पाहायला मिळणार आहे याची उत्सुकता सर्वांना लागली. शिवसेनेकडून मात्र अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
दरम्यान, यावेळी तीनचाकी सरकारचा ड्रायव्हर मीच असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले होते यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा एका गाडीमध्ये बसलेला फोटो पोस्ट करुन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या फोटोमध्ये अजित पवार स्वतः गाडीचे सारथ्य करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या या फोटोमुळे सुद्धा सर्वत्र चर्चा रंगली होती. याबाबत अजित पवार यांनी हा फोटो मुद्दाम पोस्ट केला होता असं वाटतंय का असे चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, हे सर्व हास्यास्पद सुरू असून हा सर्व बालिशपणा सुरू आहे.
एकजण म्हणतो स्टेरिंग माझ्या हातात दुसरा म्हणतो स्टेरिंग माझ्या हातात. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत काल चांगले वक्तव्य केले आहे की, स्टेरिंग जरी तुमच्या हातात असले तरी मागे बसलेले ठरवणार आहेत की जायचं कुठे आहे. त्यामुळे याकडे पाहिले तर सगळे हास्यास्पद असल्याचे त्यांनी म्हंटले.