कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या पाणीपातळीमध्ये झपाट्याने वाढ होत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पंचगंगा नदीची पाणी पातळीसुद्धा 37.2 फुटांवर पोहोचली असून कोणत्याही क्षणी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यात एनडीआरफची पथके तैनात करण्यात आली असून नागरिकांना गाव खाली करून सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गेल्या वर्षी महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या चिखली गावातील नागरिकांना सुद्धा एनडीआरफच्या पथकाकडून सूचना देण्यात येत असून पाण्याची पातळी वाढतच चालली आहे. त्यामुळे नागरिकांना आज सायंकाळपर्यंत गाव खाली करण्याचे आदेश दिले जात आहेत. यावर्षीच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा चिखली गावातील नागरिकांना गाव सोडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
सुरुवातीला नागरिकांनी आपली जनावरे सुरक्षितस्थळी हलवली आहेत. आता आज सायंकाळपर्यंत सर्व गाव खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्यावर्षी आलेल्या महापुरात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.