कोल्हापूर - गाव करील ते राव काय करील अशी एक म्हण आहे आणि कोल्हापूरतल्या एका ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर प्रत्यक्षात उतरली आहे. कारण एका गावाने तब्बल 8 माजी सरपंच आणि 2 उप सरपंचांना घरात बसवले आहे. कोणतं आहे हे भन्नाट गाव आणि नेमकं काय घडलं आहे गावात पाहुयात ईटीव्ही भारत च्या या विशेष रिपोर्ट मधून.

भन्नाट गाव आणि या गावाच्या पार्श्वभूमीवर एक नजर -
कोल्हापूरतल्या पन्हाळा गडाच्या पायथ्याला वसलेले वाघवे एक छोटंसे गाव आहे. 12 वाड्या आणि 13 वे गाव अशीही या गावाची एक वेगळी ओळख आहे. 4 हजार 200 च्या आसपास गावामध्ये मतदार आहेत. गावात विद्यमान आमदार विनय कोरे आणि माजी आमदार सत्यजित पाटील गटाचे कार्यकर्ते आहेत. गावात नेहमी दोनच पारंपरिक विरोधक असायचे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कोरे गटात फूट पडून दोन वेगवेगळ्या पॅनेलची स्थापना झाली आहे. सेनेचा गट नेहमी एकत्र मिळून ग्रामपंचायत निवडणुकीत लढत असतो. संजय माने, लक्ष्मण मुडेकर, दत्ता पाटील, कृष्णात शेलार, संजय सुतार आदी कोरे गटाचे प्रमुख नेते आहेत तर तिकडे दीपक पाटील आणि दाजी पाटील सत्यजित पाटील गटाचे प्रमुख नेते आहेत.

2021 च्या निवडणुकीत नेमकं काय घडलंय ?
राज्यात अनेक ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाल्याचे चित्र आहे. तर अनेक गावांनी निवडणुकीपूर्वी ग्रामपंचायत बिनविरोध केल्या आहेत. मात्र, वाघवे गावातील मतदारांनी आपल्या बहुमोल मताद्वारे तब्बल 8 माजी सरपंचांना किंव्हा सरपंच-पतीला आणि 2 उप सरपंचांना घरी बसवले आहे. ज्यांच्या घरात कधीकाळी सरपंच पद गेले आहे त्या घरातील उमेदवारांना गावाने नाकारल्याचे निकालातून स्पष्टपणे समोर आले आहे. आरक्षणानुसार आपली पत्नी किंव्हा स्वतः ग्रामपंचायत निवडणुकीत हे नेते उतरवले होते.मात्र,त्यांना मतदारांनी नाकारल्याने पराभवाच्या नामुष्कीला त्यांना सामोरे जावे लागले आहे.
सरपंच पद भूषविलेले किंव्हा ज्यांच्या कुटुंबातील व्यक्तीने सरपंच पदाचा कार्यभार सांभाळला त्यावर एक नजर -
- सदाशिव जाधव - हे स्वतः 1982-83 आणि 2001-2005 या काळात गावात सरपंच पदावर होते. यावर्षी पुन्हा त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांत 2 मधून दंड थोपटले होते. मात्र,मतदारांनी त्यांना नाकारले.
- लक्ष्मण मुडेकर - हे 1985-88 या काळात गावात सरपंच पदावर होते. यावर्षी पुन्हा ते ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक 4 मधून निवडणूक रिंगणात उतरले होते. मात्र,मतदारांनी त्यांना नाकारले.
- चंद्रकांत विभूते - हे गावात 2005-09 या काळात सरपंच पदावर होते. यावर्षी पुन्हा त्यांनी आपल्या पत्नी सौ. नीता विभूते यांना प्रभाग क्रमांक 5 मधून ग्रामपंचायत निवडणुकीत उतरवले होते. मात्र, तदारांनी त्यांना नाकारले
- संजय सुतार - हे गावात एप्रिल 2015 ते ऑगस्ट 2015 या कार्यकाळात सरपंच पदावर होते. यावर्षी पुन्हा त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्या पत्नी सौ. मनीषा सुतार यांना प्रभाग क्रमांक 1 मधून उतरवले होते. मात्र,त्यांचा 3 मतांनी पराभव झाला.
- जयश्री साठे : या सुद्धा ग्रामपंचायत निवडणुकीत 2019 ते 2020 या काळात सरपंच पदावर कार्यरत होत्या. त्यांनी यावर्षी पुन्हा पर्वभाग क्रमांक 5 मधून ग्रामपंचायत निवडणूक लढवली. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
- बळीराम उदाळे : हे सुद्धा ओकतोबात 2009 सप्टेंबर 2010 या काळात गावात सरपंच पदावर होते. यावर्षी पुन्हा ते ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक 4 मधून निवडणूक रिंगणात उतरले होते. मात्र, मतदारांनी त्यांनाही स्पष्टपणे नाकारले.
- बाजीराव उदाळे : हे सुद्धा फेब्रुवारी 2014 ते मे 2015 या काळात गावात सरपंच पदावर होते. यावर्षी पुन्हा त्यांनी आपल्या पत्नी सौ. योगिता उदाळे यांना प्रभाग क्रमांक 4 मधून ग्रामपंचायत निवडणुकीत उतरवले होते. मात्र, मतदारांनी त्यांना नाकारले.
- सुनीता चौगले : या सुद्धा सप्टेंबर 2015-19 या काळात गावात सरपंच पदावर कार्यरत होत्या. यावर्षी पुन्हा त्यांचे पती अरुण चौगले प्रभाग क्रमांक 5 मधून निवडणूक रिंगणात उतरले होते. मात्र, मतदारांनी त्यांनाही स्पष्टपणे नाकारले.
उपसरपंच पद भूषविलेले किंव्हा ज्यांच्या कुटुंबातील व्यक्तीने सरपंच पदाचा कार्यभार सांभाळला त्यावर एक नजर -
- एम. डी. कांबळे : हे 2006 ते 2008 या कार्यकाळात उपसरपंच पदावर होते. यावर्षी ते प्रभाग क्रमांक 4 मधून पुन्हा अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरले होते. मात्र त्यांनाही मतदारांनी नाकारले.
- जयसिंग साठे : हे सुद्धा 2014 ते ऑगस्ट 2015 कार्यकाळात उपसरपंच पदावर कार्यरत होते यावेळी त्यांच्या पत्नी प्रभाग क्रमांक 5 मधून निवडणूक लढवत होत्या. त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. कोल्हापूरातलं भन्नाट गाव ! 10 माजी सरपंच-उपसरपंचांना मतदारांनी बसवले घरी
गावात निवडणुकीपूर्वी बिनविरोधचे प्रयत्न -
गेल्या अनेक वर्षांपासून गावात निवडणुकीनंतर गट तट निर्माण होत असतात. शिवाय गल्ली गल्लीमध्ये अबोला निर्माण होत असतो. शिवाय या गटांच्या राजकारणामुळे गावाचा विकास मागे पडतो. म्हणूनच गावातील काही जाणकारांनी मिळून पुढाऱ्यांना एकत्र केले शिवाय त्यांना समान वाटा देत बिनविरोध करण्याबाबत आवाहन केले. सर्व पुढाऱ्यांनी सहमती सुद्धा दर्शवली. मात्र, काही कारणास्तव गावातील निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. जर निवडणूक बिनविरोध झाली असती तर नक्कीच गावाच्या विकासाला एक नवीन दिशा मिळाली असती असे गावातल्या अनेकांचे म्हणणे आहे.
