कोल्हापूर - बेळगावमधील दीड वर्षांच्या बाळाने नागाला स्पर्श केलेला व्हिडिओ अनेकांनी पहिला आहे. अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकवेल असाच तो व्हिडिओ आहे. बेळगावमधील कंग्राळी बुद्रुक येथील राजू पाटील यांचा तो वेदांत हा लहान मुलगा आहे. मात्र त्या चिमुकल्या वेदांतचा व्हिडिओ करणारे त्याचे चुलते अजित पाटील मात्र अजूनही या धक्क्यातून सावरले नाहीत. माझ्याकडून जी चूक झाली ती इतर कोणाकडूनही होऊ नये, म्हणून पालकांनी आपल्या लहान मुलांना शक्यतो रानामध्ये घेऊन जाऊच नये आणि गेलाच तर त्याची काळजी घ्या असे त्यांनी म्हटले आहे. केवळ देवाच्या कृपेमुळे बाळ यामध्ये वाचले अन्यथा मी स्वतःला कधीही माफ करू शकलो नसतो, असेही त्यांनी सांगितले आहे.
शनिवारी दुपारी 2 च्या दरम्यान, कंग्राळी बुद्रुकमधील पाटील कुटुंबीय आपल्या रानात भात पेरणीसाठी गेले होते. पण जो व्यक्ती भात पेरणीसाठी कुरी घेऊन येणार होता, त्याला यायला थोडा उशीर झाल्याने चिमुकल्या वेदांतचे काका अजित पाटील त्याचा खेळत असताना व्हिडिओ करत होते. मात्र याच दरम्यान वेदांतला रानामध्ये नाग दिसला. त्याने त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असतानाच काकांचे लक्ष त्याकडे गेले. फणा काढलेला नाग पाहून काकांनी वेदांतकडे धाव घेत त्याला कडेवर घेतले.
हा संपूर्ण प्रसंग इतका भयंकर होता की, अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला. काका अजित पाटील यांना या घटनेनंतर प्रचंड मोठा धक्का बसला आहे. अजूनही त्यांना ही घटना डोळ्यासमोर दिसत आहे. जर बाळाने नागाला पकडले असते किंव्हा नाग चावला असता तर असे अनेक विचार त्यांच्या मनात अजून येत आहेत. माझ्याकडून जी चूक झाली ती इतरांकडून होऊ नये, म्हणून आपल्या लहान मुलांना रानामध्ये घेऊन जाऊच नका असे त्यांनी म्हटले आहे.