कोल्हापूर - महापुरात शेतीचे नुकसान झाल्याने पांडूरंग पाटील या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच वंदूर गावातील दत्तात्रय रणदिवे या तरूणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. महापुरामुळे झालेल्या नुकसानीच्या धक्क्यातून न सावरलेल्या वंदूरमधील दत्तात्रय बाळू रणदिवे या तरुणाने जीवनयात्रा संपवली. दत्तात्रयने राहत्या घरी नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतल्याचे उघडकीला आले आहे. महापुराच्या काळात दत्तात्रयच्या घरात पाणी शिरुन मोठे नुकसान झाले होते. त्याच्या शेतीचेही महापुराने नुकसान झाल्याने तो चिंतेत होता. गेल्या काही दिवसांपासून नुकसानीच्या धक्क्यामुळे तो तणावाखाली वावरत होता.
दत्तात्रयच्या दुर्दैवी निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. महापुराच्या काळात सुदैवानं जिल्ह्यात जीवितहानी झाली नाही. पण आता महापुराने सगळेच उद्ध्वस्त झाल्याने पुढे काय ही चिंता सतावू लागली आहे. राधानगरी तालुक्यातील तिटवे येथील पांडुरंग पाटील, तर वंदूरमधील दत्तात्रय रणदिवे या दोन शेतकर्यांनी केलेल्या आत्महत्यांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.