कोल्हापूर - जिल्ह्यात बुधवारी दिवसभर मुसळधार पाऊस सुरू होता. अद्याप पावसाने उघडीप दिली नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय आपत्ती पुनर्वसन दलाच्या दोन तुकड्या कोल्हापूरसाठी रवाना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.
कोल्हापूरमधील पावसाची स्थिती लक्षात घेऊन राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्या समवेत बैठक घेतली. यावेळी एनडीआरएफच्या दोन तुकड्या कोल्हापूरला पाठविण्या बाबत मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी देखील कोल्हापूरसाठी तत्काळ तुकड्या रवाना करण्याचे निर्देश दिल्याचे राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी सांगितले.
दरम्यान कोल्हापुरातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा झपाट्याने वाढ होत आहे. सद्याची पाणी पातळी 39 फुटांवर पोहोचली असून कोणत्याही क्षणी धोका पातळी गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून एनडीआरएफच्या दोन तुकड्या कोल्हापूरला यायला रवाना झाल्या.
गेल्या वर्षी अतिवृष्टी होऊन कोल्हापूर शहर परिसर पाण्याखाली आला होता.पंचगंगेच्या पुरामुळे जिल्ह्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. बंगळुरू महार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. ती परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून राज्य सरकारकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.