कोल्हापूर - मागील वर्षी अतिवृष्टीमुळे आंबोलीचे पर्यटन ठप्प झाले होते, तर यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे व्यवसाय बंद पडल्याने तेथील पर्यटनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेल्या व्यवसायिकांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
पावसाळा सुरू झाल्यानंतर सर्वांना चाहूल लागते ती पर्यटनाची. अनेकांच्या डोळ्यासमोर येतो तो कोल्हापुरातील आंबोली धबधबा. मात्र, सलग दुसऱ्या वर्षी सुद्धा आंबोली धबधबा वर्षा पर्यटनासाठी बंद आहे. त्यामुळे येथील व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे घाट खचल्याने आंबोलीचे पर्यटन ठप्प झाले होते, तर यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे व्यवसाय बंद झाल्याने येथील व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
हेही वाचा - स्पेशल रिपोर्ट; आधार कार्ड सक्ती असूनही होतोय 'रेमडेसिवीर'चा काळाबाजार
उंचच्या उंच डोंगरमाथ्यावरून कोसळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र धबधब्याचे ठिकाण म्हणजे आंबोलीतील मुख्य धबधबा, कावळेसाद पॉईंट, हिरण्यकेशी, नांगरतास धबधबा, बाबा धबधबा अशी अनेक वर्षापर्यटनाची ठिकाणे या परिसरात आहेत. त्यामुळे दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक इथल्या निसर्ग सौंदर्याचा आणि धबधब्यांचा आनंद घ्यायला येत असतात. यावरच अनेकांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, गेल्यावर्षी आतिवृष्टीमुळे घाट बंद होऊन व्यवसाय ठप्प झाले आणि यावर्षी सुद्धा कोरोनाच्या संकटामुळे व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे हाताला कामच नसल्याने व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी वर्षा पर्यटनासाठी नागरिक येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस सुद्धा यावर लक्ष ठेवून असून याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्यात येत आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये इथल्या सर्वच व्यावसायिकांचा व्यवसाय अगदी तेजीत असतो. मात्र, सलग दुसऱ्या वर्षी ऐन पावसाळ्यात पर्यटन बंद असल्याने इथले व्यावसायिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे ही सगळी परिस्थिती पूर्वपदावर येण्याची ते वाट पाहत आहेत.