कोल्हापूर: आक्षेपार्ह स्टेटसनंतर झालेल्या दंगलीनंतर आता कोल्हापुरातील कागल शहरात एका 38 वर्षीय तरुणाने टिपू सुलतानच्या उदात्तीकरणाचा स्टेटस लावला. त्यानंतर कागल शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत या तरुणाला अटक करण्याची मागणी कागल पोलिसांकडे केली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ त्या तरुणाला ताब्यात घेतले आहे.
कागल शहर बंदची हाक : राजर्षी शाहू महाराजांची जनक भुमी असलेल्या कागल शहरात असा प्रकार घडल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. तर आरोपीला ताब्यात घेतल्यानंतरही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी कागल शहर बंद करण्याचे आवाहन केले होते. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत करण्याचे प्रयत्न केले. पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कागल बंदची मागणी मागे घेण्यात आली आहे. मध्यरात्री साडेबारा वाजेपर्यंत पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बैठकीचे सत्र सुरू होते.
सकाळपासून सर्व व्यवहार सुरळीत: मध्यरात्री साडेबारा वाजेपर्यंत झालेल्या बैठकीनंतर शहरातील सर्व संघटनांनी कागल शहर बंद करणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र सोशल मीडियावर सकाळी साडेनऊ वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमण्याचे आवाहन केले आहे. कागल पोलिसांकडून शहरातील मुख्य चौकांमध्ये बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एकत्र जमण्यासाठी पोलिसांनी मज्जाव केल्याने शहरात तणावपूर्ण शांतता आहे. कागलचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे म्हणाले, की कागल शहरातील एका तरुणांकडून आक्षेपार्ह स्टेटस लावण्याचा प्रकार समोर आला. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या 38 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चौकाचौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
राज्यात काही जिल्ह्यांत तणावाची स्थिती: छत्रपती संभाजीनगर, बीड, नवी मुंबई, कोल्हापूर, अहमदनगर, जळगाव या जिल्ह्यांमध्ये औरंगजेबाचे उद्दातीकरण करणारे सोशल मीडिया स्टेटस ठेवल्याने तणावाची स्थिती झाली होती. कोल्हापुरात दंगलीसारखी परिस्थिती उद्भवली होती. पोलिसांनी कोल्हापुरातील दंगली प्रकरणी 30 जणांहून अधिक लोकांना अटक केली आहे. राज्यात आक्षेपार्ह पोस्ट करण्याचे प्रमाण वाढत असताना सोशल मीडियाचा वापर जपूनच करावा, असा सल्ला पोलिसांकडून देण्यात येत आहे.
हेही वाचा-