कोल्हापूर - अंबाबाईच्या दर्शनासाठीची वेळ आता आणखी वाढवण्यात आली आहे. सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत अंबाबाई मंदिर आता भक्तांना दर्शनासाठी खुले असणार आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील सर्वच धार्मिक स्थळे, मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात आली. त्यानुसार अंबाबाई मंदिरसुद्धा सुरू करण्यात आले. तेव्हापासून तिसऱ्यांदा दर्शनाची वेळ वाढविण्यात आली आहे.
हेही वाचा - कोल्हापूर 3 जानेवारीपासून 'खिळेमुक्त झाडांचे शहर' मोहिमेचे आयोजन
भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असल्याने गर्दी होऊ नये यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांना दर्शनासाठी मंदिरात जरी प्रवेश भेटला असला, तरी विविध नियम बनवण्यात आले आहेत. येणाऱ्या प्रत्येक भक्तांना मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. शिवाय अजूनही प्रत्येक भक्ताची तपासणी करूनच त्यास मंदिरात प्रवेश दिला जात आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसुद्धा करण्यात येते. त्यामुळे, भक्तसुद्धा सर्वच नियमांचे पालन करून देवस्थान समितीला सहकार्य करत आहेत.
दिवसातून 13 तास अंबाबाईचे दर्शन
सुरुवातीला सकाळी 9 ते 12 आणि सायंकाळी 4 ते 7 या वेळेत अंबाबाईच्या 4 हजार भक्तांना दर्शन मिळत होते. त्यामध्ये 2 वेळा बदल करण्यात आला. आता सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 8 पर्यंत दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे, दिवसभरात आता जवळपास 15 हजार भक्तांना दर्शन घेता येणार आहे.
हेही वाचा - कोल्हापुरात गव्यांच्या कळपाचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण