कोल्हापूर - जोरदार पावसामुळे पोल्ट्रीच्या शेडची भिंत कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन महिलांसह एका पुरुषाचा समावेश आहे. कोल्हापुरातल्या गडहिंग्लज तालुक्यातील मुगळी गावात ही घटना घडली. अजित अर्जुन कांबळे वय (48 रा. नांगनूर), गिरीजा कांबळे आणि संगीता बसाप्पा कांबळे अशी मृतांची नाव आहेत.
पावसापासून बचावासाठी घेतला आडोसा अन् घडली दुर्घटना -
मिळालेल्या माहितीनुसार नांगनूर येथील अजित अर्जुन कांबळे हा आपली विधवा बहीण गिरीजा हिच्या आजारी सासूला पाहण्यासाठी हरळी येथे गेले होते. त्यांच्या सोबत त्यांच्या दुसऱ्या भावाची पत्नी संगीता बसाप्पा कांबळे सुद्धा होत्या. आजारी सासूला पाहून घरी परत येत असताना अचानक पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसापासून बाचावासाठी त्यांनी गडहिंग्लज तालुक्यातील मुगळी गावातील रस्त्याशेजारीच असलेल्या पोल्ट्रीच्या शेडचा आडोसा घेतला. जोरदार पावसामुळे या पोल्ट्रीच्या शेडची भिंत अचानक कोसळली. या भिंतीखाली सापडून तिघांचाही जागीच मृत्यू झाला. घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.