कोल्हापूर- कोल्हापूर जिल्ह्यातल्या कळंबे गावात चारचाकी आणि एसटीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून, चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गगनबावडा मार्गावर हा अपघात झाला. चारचाकीमध्ये प्रवास करणारे हे कुटुंब आपल्या नातेवाईकाच्या अत्यंयात्रेसाठी निघाले होते.
करवीर तालुक्यातील उसगाव येथे राहणारे माळवे कुटुंब आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कळे येथील नातेवाईकाच्या अंत्ययात्रेसाठी निघाले होते. यावेळी माळवे कुटुंबियांची इनोव्हा कारला समोरून येणारी एसटी बस धडकली. या अपघातात माळवे कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चौघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात करण दीपक माळवे (वय.27), संजय दिनकर माळवे(वय.44), आक्काताई माळवे (वय.65) यांचा मृत्यू झाला आहे. पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.