कोल्हापूर - जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळा गडावर जाणारा मुख्य रस्ता खचला आहे. बुधवार पेठ या ठिकाणी खचला रस्ता असून यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. या ठिकाणची पाहणी करून वाघबीळ ते पन्हाळा गड वाहतूक बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
गडावर जाणारा मुख्य रस्ता खचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद
पन्हाळा तालुक्यात गेल्या आठवड्यापासून अतिवृष्टी सुरू असल्याने येथील परिसरात सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. तीनच दिवसांपूर्वी केर्ली - जोतिबा रस्ता सुद्धा खचला आहे. त्यामुळे केर्ली मार्गे जोतिबा जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. आता ऐतिहासिक पन्हाळा गडावर जाण्यासाठी हा एकमेव असा रस्ता पायथ्यालाच असणाऱ्या बुधवार पेठ या ठिकाणी खचल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. रस्त्याच्या मध्यभागी मोठी भेग पडली आहे. त्यामुळे सर्वांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.