कोल्हापूर - कोल्हापुरातल्या शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथील प्राचीन कोपेश्वर मंदिरातील स्वर्गमंडप कोसळण्याच्या मार्गावर असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. स्थापत्य वास्तुकलेचा अद्भुत असा अविष्कार असलेल्या या मंदिरात जो स्वर्णमंडप आहे तो गेल्या बाराशे वर्षांहून अधिक काळापासून आपले शिल्पवैभव मिरवत दिमाखात उभा आहे. मात्र, गेल्या दोन महापुरात मंदिर पूर्णपणे पाण्याखाली होते त्यामुळे मंदिराला धोका पोहोचला आहे. इथला स्वर्गमंडप तर कधीही कोसळण्याच्या मार्गावर आहे.
निधी मंजूर तरीही दुर्लक्ष
राज्य शासनाने एक वर्षांपूर्वी कोपेश्वर मंदिराला निधी मंजूर केला होता. वर्ष उलटले तरी कोणतीही कार्यवाही अध्याप पूर्ण नाही असा आरोप इथले नागरिक सातत्याने करत आहेत. राज्यातील एकूण 8 प्राचीन मंदिरांच्या विकासासाठी तब्बल 101 कोटी निधीची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे गावकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत होते. शिवाय नागरिकांनी गावात आतिषबाजी करत निर्णयाचे स्वागत केले होते. मात्र, त्याचे पुढे काहीही झाले नसल्याची अनेकजण खंत व्यक्त करत आहेत. त्यामुळे तत्काळ याकडे लक्ष देऊन हे वैभव टिकवून ठेवण्याची मागणी सर्वांमधून होत आहे.
खिद्रापूरमधील प्राचीन कोपेश्वर मंदिर कोल्हापूरचे वैभव
स्थापत्यकलेचा उत्कृष्ठ असा नमुना म्हणून कोल्हापूरातल्या खिद्रापूरमधील कोपेश्वर मंदिराची एक वेगळी ओळख आहे. जवळपास 11 व्या शतकात हे मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिरावर इतके सुंदर कोरीवकाम केले आहे ते पाहून थक्क व्हायला होते. यामध्ये इसापनीती, पंचतंत्र, रामायण, महाभारत, ब्रम्हा विष्णू आणि शिवच्या मूर्ती तसेच अनेक प्रसंग दर्शवणारे, याक्षिणी, यक्ष, विषकन्या, नर्तकी, वादक, गायक, देशविदेशातील लोक, व्याल, किर्तीमुख, झरोके, पाने, फुले, फळे, प्राणी यांचे हुबेहूब दगडी कोरीव काम करण्यात आले आहे. मात्र, या मंदिराचा म्हणावा तसा अद्याप विकास झाला नाही. इतका मोठा प्राचीन इतिहास असूनही याकडे लक्ष नाहीये असे वारंवार गावकऱ्यांकडून बोलले जाते.
दगडी खांबांना लोखंडी अँगल, रॉड
दरम्यान 2019 साली झालेल्या महापुरात कोपेश्वर मंदिराला प्रचंड धोका निर्माण झाला होता. मंदिर अर्ध्याहून अधिक पाण्यात होते. त्यानंतर लगेचच 2021 मध्येही महापुरात मंदिर 2019 पेक्षाही अधिक पाण्यात बुडाले. त्यामुळे मंदिराला मंदिराला अधिकच धोका निर्माण झाला आहे. काही खांबांना तर मोठे-मोठे तडे गेले असून काही खांबांना विशिष्ट प्रकारे लोखंडी अँगल आणि रॉड लावून खांबांना आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, शेकडो टन वजनाचे हे खांब त्यावर तग धरतील अशी परिस्थिती नसून त्याकडे तत्काळ शासनाने लक्ष द्यावे अन्यथा कोणत्याही क्षणी येथील स्वर्गमंडप कोसळण्याची शक्यता इथल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, अनेक पर्यटक, भाविक येथे भेट देत असतात त्यामुळे अचानक काही दुर्घटना घडलीच तर जीवितहानीसुद्धा होण्याची शक्यता आहे त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
हेही वाचा - Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील उवाच! म्हणाले, PM मोदी झोपच येणार नाही असा प्रयोग करतायेत