कोल्हापूर - 'मी सांगेल त्यालाच लसीकरण करा', अशी दादागिरी करून काही महिलांनी लसीकरण केंद्रावर शिवीगाळ व मारहाण केली. महिलांना मारहाणीस प्रवृत्त करणे माजी उपमहापौर महेश सावंतला चांगले महागात पडले आहे. उपमहापौराविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शिवाजी पेठेतील फिरंगाई तालीम लसीकरण केंद्रावर घडला.
काय आहे प्रकरण -
कोल्हापूर शहरात प्रत्येक आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यामुळे अनेक केंद्रावर गोंधळ निर्माण होत आहे. शिवाजी पेठेतील फिरंगाई आरोग्य केंद्रावरही गेल्या आठवडाभरात नागरिकांची लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागल्याने रोजच गोंधळाचे वातावरण निर्माण होत आहे. गुरुवारी नेहमीप्रमाणे लसीकरणासाठी गर्दी झाली होती. दुपारी परिसरातील काही महिलांनी लसीकरण केंद्रात येऊन तेथील डाटा ऑपरेटर शिवानी यादव यांच्याशी वाद घातला व शिवीगाळ करून त्यांना धक्काबुक्की केली. त्यानंतर माजी उपमहापौर महेश सावंतने शिवानी यादव यांच्या विरोधात वैद्यकीय अधिकारी योगिता भिसे यांच्याकडे तक्रार करून त्यांच्याशीही त्यांनी वाद घातला. मी सांगेल त्यालाच लसीकरण केले पाहिजे, असा हट्ट धरला.
दरम्यान, केंद्रावरील गोंधळ ऐकून बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून गोंधळ घालणाऱ्यांना केंद्राबाहेर काढले. मात्र, या घटनेनंतर केंद्रातील संतप्त कर्मचाऱ्यांनी गोंधळ घालणाऱ्यांविरोधात जुना राजवाडा पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार माजी उपमहापौरांसह सावंतसह चार महिला आणि एका अनोळखी व्यक्तीविरोधात तक्रार दिली आहे.