कोल्हापूर - संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद 2 नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर इथल्या विक्रमसिंह मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. परंतु जिल्हा प्रशासनाने या ऊस परिषदेसाठी परवानगी नाकारली आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत विक्रमसिंह मैदानावरच ऊस परिषद घेणार, अशी आक्रमक भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली असून, याबाबत निवासी जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन देण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानीची ऊस परिषद होणार की नाही, याबाबत साशंकता होती. मात्र कोणत्याही परिस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद होणार असल्याची घोषणा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली होती. या ऊस परिषदेला परवानगी मिळण्यासाठी स्वाभिमानीच्या वतीने मुख्यमंत्री आणि जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र जिल्हा प्रशासनाने या परिषदेला परवानगी नाकारली आहे.
नियमांचे पालन करून परिषद घेणार
संपूर्ण राज्याचे लक्ष या ऊस परिषदेकडे लागलं होतं, ऊस उत्पादकांच्या न्यायहक्कासाठी उभे राहिलेले हे व्यासपीठ असून, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील साखरेचे मूल्यांकन डोळ्यासमोर ठेवून, या परिषदेत ऊसदराची घोषणा होत असते. मात्र जिल्हा प्रशासनाने ऊस परिषदेला परवानगी न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत २ नोव्हेंबरला विक्रमसिंह मैदानावर ऊस परिषद घेणार असल्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली आहे. कोरोनामुळे जग संकटात सापडलं असल्याची जाणीव आम्हाला आहे. निवडक व निमंत्रित कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत, सामाजिक सुरक्षा अंतराची बंधने पाळून ही परिषद आम्ही घेऊ असं संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.