कोल्हापूर - अंबाबाई मंदिरामध्ये कोरोनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत, त्यामुळे आजपर्यंत एकाही भक्ताला किंवा मंदिरातील कर्मचारी, तसेच पुजाऱ्यांना कोरोनाची लागण झालेली नाही. प्रशासनाकडूनसुद्धा याबाबत कोणतेही आदेश आले नसल्याने मंदिर सुरूच राहणार असून, नियमांचे पालन मात्र आता अधिक कडक केले जाणार असल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील काही मंदिरे दर्शनासाठी बंद करण्यात आली आहेत. मात्र, कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर जाधव यांनी सदर माहिती दिली.
सोशल डिस्टन्स पाळणे आणि मास्क घालणे बंधनकारक
अंबाबाई मंदिरात दररोज हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात. लॉकडाऊन नंतर मंदिर उघडण्यास परवानगी देण्यात आली, तेव्हापासून आजपर्यंत भाविकांमुळे मंदिर प्रशासनातील एकाही व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे उदाहरण नाही. अंबाबाई मंदिर प्रशासनाकडून यापूर्वीसुद्धा नियमांचे काटेकोरपणे पालन केले गेले आहे. मात्र, पुन्हा एकदा महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे आता अंबाबाई मंदिर परिसरात सर्वच नियम कडक केले जाणार आहेत. यामध्ये प्रत्येक भाविकाची मंदिराबाहेरच तपासणी केली जाणार आहे. मास्क नसेल तर एकाही भक्ताला मंदिरात प्रवेश मिळणार नाही. शिवाय मंदिर परिसरात सोशल डिस्टन्सचे नियम पाळणेसुद्धा अनिवार्य असणार आहे.
कोल्हापुरात कोरोना प्रादुर्भाव नाही
एकीकडे राज्यभरात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. कोल्हापुरात मात्र कोरोना रुग्ण वाढण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र, संभाव्य धोकासुद्धा नाकारता येत नाही. प्रशासनाने अद्याप आम्हाला कोणतेही आदेश दिले नाहीत. जेव्हा प्रशासनाकडून आदेश येतील तेव्हा पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचेही मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले.