कोल्हापूर - कौटुंबिक वादामुळे माहेरी राहत असलेल्या विवाहितेने आपल्या 3 वर्षांच्या चिमुकलीसोबत विहरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. तेजस्विनी किरण मोरे (वय २४) आणि मुलगी अक्षरा (वय ३) अशी यांची नावे आहेत. तेजस्विनी कौटुंबिक वादामुळे सध्या कोल्हापूर जवळच असलेल्या गडमुडशिंगी गावात आपल्या माहेरी राहत होती. काल (14 एप्रिल) ती आपल्या मुलीला घेऊन घराबाहेर पडली होती. मात्र आज (15 एप्रिल) दुपारी त्यांचा मृतदेह गावातील त्यांच्या विहिरीमध्ये आढळला. दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
कौटुंबिक वादामुळे दोन वर्षांपासून होती माहेरी -
मिळालेल्या महितीनुसार, करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी गावातील दाजी गुरुले यांची मुलगी तेजस्विनीचा 4 वर्षांपूर्वी वसगडे गावातील किरण मोरे यांच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर त्यांना एक काव्या नावाची मुलगी झाली. मात्र हळूहळू दोघांमध्ये कौटुंबिक वादाला सुरुवात झाली. वाद इतक्या टोकाला गेला की तेजस्विनी गेल्या 2 वर्षांपासून आपल्या माहेरी राहू लागली होती.
न्यायालयात घटस्फोटाचा दावाही केला होता दाखल -
मिळालेल्या माहितीनुसार, तेजस्विनी आणि किरण यांच्या घटस्फोटाचा दावाही न्यायालयात दाखल करण्यात आला होता. त्यावरून गेल्या काही दिवसांपासून ती निराश होती. मात्र काल (14 एप्रिल) तेजस्विनी आपल्या 3 वर्षांच्या काव्याला घेऊन घराबाहेर पडली. रात्र झाली तरी घरी परत आली नसल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. मात्र ती कुठेही सापडली नाही. शेवटी आज दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान गडमुडशिंगी गावातील त्यांच्याच विहीरत तिचा आणि तिच्या 3 वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह तरंगताना आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस अधिक तपास करत आहेत.