कोल्हापूर - शेतजमिनीच्या जुन्या सातबारा उताऱ्याप्रमाणे ऑनलाईन सातबाराच्या उताऱ्यामध्ये जमीन क्षेत्राची दुरुस्ती करून, नवीन सातबारा उतारा देण्यासाठी 25 हजारांची लाच स्वीकारताना तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला आहे. मारुती रामू खपले (रा. कणेरी फाटा ता. करवीर), असे अटकेत असलेल्या तलाठ्याचे नाव आहे. ही कारवाई कोल्हापुरातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (11 ऑगस्ट) दुपारी कागल तालुक्यातील माद्याळ येथे ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, कागल तालुक्यातील माद्याळ (ता .कागल) येथील एका शेतकऱ्याने त्याच्या जमिनीच्या जुन्या सातबारा उताऱ्याप्रमाणे ऑनलाईन सातबारा उताऱ्यामध्ये जमीन क्षेत्राची दुरुस्ती होऊन तसेच नवीन सातबारा उतारा मिळण्यासाठी माद्याळ येथील तलाठी कार्यालयात काही दिवसांपूर्वी अर्ज दिला होता. या कामासाठी येथील तलाठी मारुती रामू खपले याने त्या शेतकऱ्याकडे 4 ऑगस्टला 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती खपले याला 45 हजार रुपये देण्याचे ठरले होते.
मात्र, त्या शेतकऱ्याने कोल्हापुरातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत माहिती देऊन तक्रार केली होती. त्यानुसार या विभागाने तक्रारीची शहानिशा करून मंगळवारी माद्याळ येथील तलाठी कार्यालयात सापळा रचला होता. त्यावेळी संबंधित शेतकऱ्यांकडून ठरलेल्या 45 हजार पैकी 25 हजारांची लाच घेताना मारुती खपले या तलाठ्याला रंगेहात पकडण्यात आले. त्याला अटक करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे.