कोल्हापूर - जर अजित पवारांचा जयंत पाटील मुख्यमंत्री व्हावे, यासाठी पाठिंबा असेल तर आमचा पाठिंबा नसण्याचे कारण नाही. आपल्या पक्षाचा, आपल्या विचारांचा मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा असण्यात गैर काय? अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. असे वक्तव्य करून त्यांनी एका अर्थी जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्याला पाठींबाच दिला असल्याची चर्चा होत आहे.
पोलिसांनीच सत्य बाहेर काढावे -
धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतल्याबाबतसुद्धा सुळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. पोलिसांनीच आता चौकशीतून सत्य समोर आणण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय सिरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. प्रशासनाने आगीनंतर नुकसान टाळण्यासाठी उचललेल्या पावलांचे कौतूक करत त्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली.
काय म्हणाले होते जयंत पाटील -
इस्लामपूरमध्ये एका स्थानिक केबल वाहिनीच्या उद्घाटन प्रसंगी दिलेल्या मुलाखतीत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाविषयीची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नवीन चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री होण्याचे सर्व गुण आहेत, पण तरीही मुख्यमंत्री पद हुलकावणी देत आहे, असे वाटत नाही का किंवा मुख्यमंत्री व्हावेसे वाटत नाही का? असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर जयंत पाटील यांनी ही इच्छा बोलून दाखवली. आमच्या पक्षाकडे मुख्यमंत्री पद आलेले नाही. तसेच प्रत्येक राजकारण्याला मुख्यमंत्री व्हावेसे वाटते. तसे मलाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटते, पण आमच्या पक्षात पक्ष आणि शरद पवार जो निर्णय घेतली तो अंतिम असतो, असे स्पष्ट करत आपल्या मनातील सुप्त भावना त्यांनी व्यक्त केली.
केंद्र सरकार असंवेदनशील -
कृषी कायद्याबाबत बोलताना त्यांनी, केंद्र सरकार असंवेदनशील असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकार केवळ बैठकांचा दिखावा करत असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली. शेतकऱ्यांबाबत पोलिसांच्या भूमिकेचा त्यांनी निषेध केला. भाजपच्या या असंवेदनशीलपणामुळेच भाजपाचे अनेक नेते पक्ष सोडत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. आगामी संसदे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यातील खासदारांदरम्यान काल (गुरुवार) मुंबईमध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सुद्धा केंद्राकडून राज्याला दुजाभावाची वागणूक दिली जाते. त्याला संसदीय आधीवेशनात कशा पद्धतीने सामोरे जायचे याबाबत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली.