कोल्हापूर - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. याबाबत आदेश सुद्धा काढण्यात आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे यामध्ये धार्मिक स्थळे, मंदिरे सुरू राहणार आहेत. असे असले तरी वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर तसेच जोतिबा मंदिरातील दर्शन संख्या कमी करण्यात आली आहे. आता प्रत्येक तासाला केवळ 400 भाविकांना दर्शन घेता येणार आहे. याबरोबरच आणखी काही नियमावली घालण्यात आली असून कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून त्यामध्ये बदल करण्यात येणार आहे.
शासनाचे आदेश आल्यानंतर त्या पद्धतीने निर्णय घेऊ -
दरम्यान, सद्यस्थितीत धार्मिक स्थळे बंद करण्याबाबत काहीही आदेश नाही. मात्र धार्मिक स्थळांवर कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होत आहे की नाही याची पाहणी केली जात आहे. खबरदारी तसेच सोशल डिस्टन्स म्हणून आता तासाला केवळ 400 भाविकांना दर्शन दिले जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, शासनाकडून ज्या पद्धतीने पुढील आदेश येतील त्यापद्धतीने निर्णय घेण्यात येईल अशी माहिती सुद्धा देवस्थान समितीकडून देण्यात आली आहे.
हे ही वाचा - Corona Restrictions In Maharashtra : मंत्रालयाचा कारभार पुन्हा ५० टक्क्यांवर, दोन शिफ्टमध्ये होणार कामकाज
ई-पास शिवाय मंदिरात दर्शनासाठी प्रवेश नाही -
दरम्यान, नवरात्रोत्सवापासून राज्यभरातील मंदिरे पुन्हा एकदा सुरू झाली. कोरोना नियमावली नुसार ई-पास घेऊनच मंदिरात प्रवेश दिला जात आहे. कोल्हापुरातील अंबाबाईच्या दर्शनासाठी राज्यासह देशभरातील भाविक येत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दीची शक्यता पाहून तासाला केवळ 1 हजार ते 1500 भाविकांना दर्शन दिले जाऊ लागले. ते सुद्धा कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले प्रमाणपत्र असेल तरच प्रवेश मिळत आहे. आता पुन्हा एकदा राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे राज्य शासन कडक नियमावली घालत असून मंदिरांबाबत सुद्धा नवीन नियमावली जाहीर होईल, अशी शक्यता आहे. तत्पूर्वी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मंदिरात तासाला जितक्या भाविकांना दर्शन दिले जात होते. त्याची संख्या कमी करण्यात आली असून तासाला आता केवळ 400 भाविकांना दर्शन दिले जात आहे. शिवाय कोणत्याही भाविकांना ई पास शिवाय दर्शन दिले जात नाही.
हे ही वाचा - Mumbai Airport Fire : मुंबई एअरपोर्टवर मोठी दुर्घटना टळली; पुशबॅक देणाऱ्या वाहनाला प्रवाशांनी भरलेल्या विमानाजवळच आग
याची होते कडक अंमलबजावणी -
अंबाबाई मंदिरमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक नियमावली आहे. प्रत्येक भाविकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन डोस घेतले आहेत का, याची पाहणी करूनच त्यांना ई-पास दिला जातो. शिवाय मंदिरात प्रवेशावेळी प्रत्येकाचे सॅनिटायझेशन केले जाते. मंदिरात सोशल डिस्टन्सचे सुद्धा काटेकोरपणे पालन व्हावे, याची दक्षता घेतली जाते. अजूनही भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश दिला जात नाही. कासव चौक येथूनच अंबाबाईचे दर्शन घेऊन भक्तांना दर्शन मार्गावरून बाहेर पडावे लागत आहे.