कोल्हापूर - राजस्थानच्या एका छोट्याशा गावातून जितेंद्र सिंह गुजरातमध्ये कामानिमित्त आले आणि तिथेच ते स्थायिक झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते गुजरातमध्ये सुरक्षा रक्षकाची (सेक्युरिटीची) नोकरी करतात. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगा सुद्धा राहतो. गेल्या 21 वर्षांपासून ते देशासाठी बलिदान दिलेल्या प्रत्येक जवानाच्या परिवाराला पत्र लिहीत आले आहेत. नुकतेच त्यांनी कोल्हापुरातील दोन हुतात्मा जवान ऋषिकेश जोंधळे आणि संग्राम पाटील यांना सुद्धा पत्र लिहले. प्रत्येकाला वीरमरण आलेल्या जवानांप्रती आदर असतो. जवानांच्या परिवाराला सुद्धा नेहमी आपण एका शूर पुत्राला जन्म दिला होता, अशीच भावना येत राहावी या उद्देशाने ते हा उपक्रम राबवतात.
कारगिल युद्धापासून सुरू आहे हा उपक्रम -
कारगिल युद्धापासून जितेंद्र सिंह यांनी हुतात्मा जवानांच्या परिवाराला पत्र लिहायला सुरुवात केली. सर्वात पहिले पत्र त्यांनी खडकसिंह नावाच्या एका हुतात्मा जवानांच्या परिवाराला पाठवले होते. तेव्हापासून त्यांनी आजपर्यंत पत्र लिहण्याचा उपक्रम सुरूच ठेवला आहे. आजही खडकसिंह यांच्या परिवारातील मुले जितेंद्र सिंह यांच्या संपर्कात असून नेहमी एकमेकांची खुशाली विचारत असतात. जितेंद्र सिंह म्हणतात, कारगिल युद्धावेळी अनेक जवानांनी आपल्या कुटुंबीयांना पत्र लिहली होती. मात्र, पत्र घरी पोहोचेपर्यंत अनेकजण हुतात्मा झाले होते आणि म्हणूनच मी अशा सर्वच कुटुंबीयांना पत्र लिहत आलो आहे.
पत्रास कारण की.. -
जितेंद्र सिंह पत्राद्वारे सर्वप्रथम हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहतात. शिवाय जवानांबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर असायला हवा असे म्हणत प्रत्येकाचे बलिदान व्यर्थ होऊ देणार नाही. प्रत्येकाचे बलिदान देश आयुष्यभर लक्षात ठेवत राहील, असे सांगतात. कोल्हापुरातील दोन्ही हुतात्मा जवानांच्या कुटुंबाला लिहलेल्या पत्रातून सुद्धा त्यांनी श्रद्धांजली वाहून कधी योग आल्यास आपल्या गावी येऊन वीरपुत्रांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून जाईन असेही म्हंटले आहे.
अनोख्या उपक्रमाची 'बजाज' कंपनीकडूनसुद्धा दखल -
जितेंद्र सिंह यांच्या या अनोख्या उपक्रमाची 'बजाज' कंपनीनेसुद्धा दखल घेतली आहे. कंपनीने आम्ही आपल्यासाठी काय करू शकतो विचारताच, त्यांनी मला हुतात्मा जवानांच्या कुटुंबांना भेटायचे असल्याबाबत इच्छा व्यक्त केली. कंपनीने सुद्धा त्यांची इच्छा तत्काळ पूर्ण करण्याचा निर्णय घेत राजस्थानमधील अनेक हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांशी जितेंद्र सिंह यांची भेट घालून दिली. परिस्थिती नाजूक असल्याने इच्छा असून सुद्धा ते अनेक जवानांच्या कुटुंबाला भेटू शकत नव्हते. मात्र, त्यांची इच्छा 'बजाज'ने पूर्ण केल्याचे जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.
'पोस्टकार्ड'चे दर महाग झाल्यावर पंतप्रधानांनाही लिहले होते पत्र -
जितेंद्र सिंह जवानांच्या कुटुंबीयांना जे पोस्टकार्ड पाठवतात. त्याचे गेल्या काही वर्षांपूर्वी दर वाढले होते, तेव्हा त्यांनी देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा पत्र लिहले होते. शिवाय आपण अनेक जवानांना पत्र पाठवत असतो, त्यामुळे वाढलेले दर कमी करावेत, अशी मागणी त्यांनी तत्कालीन पंतप्रधानांकडे पत्राद्वारे केली होती, असे जितेंद्र सिंह यांनी म्हटले.
हुतात्मा जवानाचेच नाव ठेवले स्वतःच्या मुलाला -
जितेंद्र सिंह यांना जवानांप्रती इतका आदर आणि सन्मान आहे की, त्यांना मुलगा झाला त्यावेळी जे जवान शहीद झाले होते त्यांचेच नाव त्यांनी स्वतःच्या मुलाला ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले.
अनेकांना त्यांच्या कामाची प्रेरणा -
जितेंद्र यांच्या या कार्याची दखल घेत अनेकांनी त्यांना पोस्ट देऊ केले तर अनेकांनी मदतीबाबत विचारणा केली आहे. अमेरिकेतील एका उद्योजकाने सुद्धा अशाच पद्धतीने मदत करण्याबाबत विचारणा केली होती. त्यावर जितेंद्र सिंह यांनी राजस्थानमधील हुतात्मा जवानांच्या 20 मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याबाबत त्यांना कळविले. त्यानुसार सद्या ती मुले राजस्थानमध्ये शिक्षण घेत आहेत.