कोल्हापूर : एसटी महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्या अनुषंगाने एसटी महामंडळ आता राज्यात पेट्रोल-डिझेलची सेवा ग्राहकांना देणार आहे. राज्यात 30 ठिकाणी पेट्रोल पंप सुरू करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली. सध्या एसटीला प्रवाशांचा प्रतिसाद कमी आहे. मात्र, निर्णय झाल्यास एसटीची जिल्हाबंदी उठवण्याचा निर्णय घेतला जाईल. एसटी करण्याची तयारी आहे असेही पाटील म्हणाले.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू झाला. त्यामुळे गेले पाच महिने एसटी महामंडळ अडचणीत आहे. त्या अनुषंगाने एसटीचे उत्पन्न कसे वाढवता येईल, या दृष्टीने राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असे परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले. एसटी महामंडळाने मालवाहतूक सेवा सुरू केली आहे. त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुढचा टप्पा म्हणून राज्यातील एसटी महामंडळाच्या जागेच्या ठिकाणी पेट्रोल पंप सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील 30 ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलची विक्री सुरू करणार असल्याचे ते म्हणाले. तसेच, पुढील काळात एसटीच्या माध्यमातून कुरिअर सेवा सुरू करण्याचे विचाराधीन असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
एसटीची जिल्हा बंदी उठवावी अशी मागणी राज्यभरातून होत आहे. त्यावर बोलताना राज्यमंत्री पाटील म्हणाले, गणेशोत्सवासाठी कोकणात तीन हजार ज्यादा बसेस सोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या मनात भीती असल्याने केवळ 600 पेक्षा कमी बसेस कोकणात गेल्या. म्हणावा तसा प्रवाशांचा प्रतिसाद नाही. यामुळे याबाबत निर्णय झाल्यास जिल्हाबंदी उठवून एसटी राज्यभर सुरू करण्याची तयारी असल्याचे परिवहन राज्यमंत्री पाटील यावेळी म्हणाले.