कोल्हापूर - दारू पिण्यासाठी स्वतःच्या आईला ठार मारून तिचे काळीज काढणाऱ्या नराधमाला गुरूवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. सुनील कोचकोरवी असे आरोपीचे नाव आहे. पैसे न दिल्याच्या रागातून मद्यपी मुलाने आईचा निर्घृण खून केला होता. आईच्या मृतदेहाचे तुकडे करून तिचे काळीजही बाजुला काढले होते. ही धक्कादायक घटना कोल्हापुरात कावळा नाका परिसरातील माकडवाला वसाहतीत २८ ऑगस्ट २०१७ साली घडली होती. यल्लव्वा (जनाबाई) रामा कूचकोरवी असे मृत वृद्धेचे नाव होते. हल्लेखोर मुलगा सुनीलला याप्रकरणी कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी फाशीची शिक्षा सुनावली आहे.
- दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने केले होते कृत्य -
माकडवाला वसाहतीतील यल्लव्वा ही वृद्धा शाहूवाडी, मलकापूर परिसरात फुगे, कंगवे विक्रीचे काम करीत होती. पंधरा-वीस दिवसांनी ती कोल्हापुरातील घरी येऊन पुन्हा माघारी जात होती. मोठा मुलगा राजू (३०) आणि सुनील ही दोन्ही मुले सेंट्रिंगचे काम करतात. यातील सुनील हा माकडवाला वसाहतीतील पत्र्याच्या घरात राहत होता. सुनील हा सतत मद्यप्राशन करून घरात पत्नी आणि मुलांना मारहाण करीत असल्याने त्याची घरात दहशत होती. दहाच्या सुमारास यल्लव्वा घरात आल्यानंतर सुनीलने तिच्याकडे पैशांची मागणी केली. दारू पिण्यासाठी पैसे देण्यास आईने नकार दिल्याने या दोघांमध्ये वाद झाला. यानंतर घराबाहेर पडलेला सुनील एकच्या सुमारास नशेतच घरात आला. त्याने आईशी वाद घालत तिच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. डाव्या बाजूने पोट फाडून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. मुख्य रस्त्यापासून आत घडलेला हा प्रकार परिसरात कोणाच्या लक्षात आला नाही.
- चाकूसह आरोपीला पोलिसांनी केली होती अटक -
दुपारी दीडच्या सुमारास गल्लीतील एका चार वर्षीय मुलीने यल्लव्वा यांच्या घरातून बाहेर येणारे रक्त पाहिले. घाबरलेल्या मुलीने याची माहिती तिच्या नातेवाईकांना दिली. यानंतर परिसरातील नागरिकांनी यल्लाव्वाच्या घरात पाहिले असता तिचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत दिसला. काळजाचे तुकडे एका भांड्यात ठेवले होते. चटणी आणि मिठाची बरणीही शेजारीच होती. मुलगा सुनील हा नशेत घरातच पडला होता. नागरिकांनी शाहूपुरी पोलिसांना घटनेची माहिती कळवताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागिरकांच्या मदतीने हल्लेखोर सुनील याला ताब्यात घेतले, त्याचबरोबर चाकूही जप्त केला.
- आईच्या काळजाचे केले होते तुकडे -
विक्षिप्त स्वभावाचा सुनील नेहमीच किरकोळ कारणांवरून घरात पत्नीसह आई आणि भावाशी वाद घातल होता. नशेत मारहाण करीत असल्याने कोणीच त्याच्यासोबत राहत नव्हते. जवळचे पैसे संपल्याने तो आईकडे पैसे मागत होता. आईने पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून त्याने आईचेच काळीज काढले. काळजाचे तुकडे कापून एका भांड्यात काढले होते. याशिवाय शेजारी चटणी आणि मिठाची बरणीही होती. हल्लेखोर मुलगा आईची काळीज भाजून खाण्याच्या तयारीत होता.