कोल्हापूर - रात्री शेतामध्ये पाणी पाजत असताना साप, बिबट्या, गवा, अस्वल, रानडुक्कर अशासारखे जंगली प्राणी आढळल्यास त्यांना इजा न करता त्यांना ताब्यात घेऊन आणि जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या सरकारी कार्यालयात आणून सोडावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी ( raju shetty appeal ) केले होते. राजू शेट्टींनी केलेल्या आवाहनानंतर रात्रपाळीला पाणी पाजवत असताना सापडलेले साप अज्ञात शेतकऱ्यांनी शिरोळच्या तहसिल कार्यालयात सोडल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. त्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आला होता. त्यानंतर आज इचलकरंजी येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या टेबलवर साप सोडल्याची ( Snake Released in Offices Kolhapur ) घटना घडली आहे.
उपजिल्हाधिकाऱ्यांनाही साप केला सुपर्द -
महावितरणकडून दिवसा 10 तास वीज मिळावी यासाठी माजी खासदार राजू शेट्टी हे 5 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. त्यात आता शेट्टींनी केलेल्या आवाहनानंतर अनेक शेतकरी आपल्या नजीकच्या कार्यालयात जाऊन साप सोडत असताना पाहायला मिळत आहे. त्यांच्या या आवाहनानंतर शेतकऱ्यांनी चक्क सापांना जिल्हाधिकारी कार्यालयात आणले. आणलेले हे साप “माझी शेती माझी जबाबदारी” या धोरणानुसार निवासी उप जिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांच्याकडे शेतकऱ्यांनी सुपूर्द केला.
नरंदे येथील शेतकऱ्यांनी आणले जिल्हाधिकारी कार्यालयात साप -
दरम्यान, दिवसा 10 तास वीज मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महावितरण कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या दरम्यान राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या अनेक समस्या मांडल्या. रात्रीचे शेतीला पाणी देणे किती अडचणीचे असते शिवाय अनेक जंगली प्राण्यांचा सुद्धा शेतकऱ्यांना किती धोका असतो. हे त्यांनी वारंवार या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला सांगितले आहे. याच दरम्यान, शेट्टी यांनी शेतामध्ये पाणी पाजत असताना साप, बिबट्या, गवा, अस्वल, रानडुक्कर अशासारखे जंगली प्राणी आढळल्यास त्यांना इजा न करता त्यांना ताब्यात घेऊन आणि जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या सरकारी कार्यालयात आणून सोडावे असे शेतकऱ्यांना आवाहन दिले होते. त्याला प्रतिसाद देत “माझी शेती माझी जबाबदारी” या धोरणानुसार रात्री शेतात पाणी पाजत असताना नरंदे येथील शेतकऱ्यांना मिळालेले साप त्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातच आणले. आणलेले हे साप निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. जंगली प्राण्यांची जोपासणा व संवर्धन करणे ही संपुर्ण जबाबदारी सरकारची आहे. यामुळे हे प्राणी जर चुकून आपल्या शेतात आले तर त्यांना त्यांच्या संरक्षणार्थ सरकारी कार्यालयात सोडणे आपली जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पार पडण्यासाठी शेतकऱ्यांनी हे साप पकडून त्यांच्याकडे सुपुर्द केले.
तर जंगली प्राणी शासकीय कार्यालयातच सोडणार -
सरकारने दिवसा वीज देण्याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास बिबट्या, गवा, अस्वल, रानडुक्कर, मगर यासारखे प्राण्यापासून शेतक-यांच्या जीवातास धोका आहे त्यामुळे यापुढे सापडलेले जंगली प्राणी या कार्यालयात सोडण्यात येणार असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी सांगितले. यावेळी अरूण मगदूम, विशाल चौगुले, संपत पवार, श्रीकांत पाटील यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - Ajit Pawar In Pune : अन् अजित पवार संतापले; म्हणाले, मग काय तुरुंगात जाऊ...